ठाणे : लोकांना पर्याय हवा असतो. जनता समर्थ पर्यायाच्या शोधात असते. आम्ही समर्थ पर्याय देऊ इच्छितो, असे आव्हान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात जाऊन दिले.
ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या शुभारंभासाठी सोमवारी संध्याकाळी ते आले होते. या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण काही दिवसांपासून शिवसेनेने मिशन कळवा सुरू केल्याने राष्ट्रवादीसह आव्हाड अवस्थ झाले होते.
मधल्या काळात आघाडीतदेखील पुन्हा बिघाडी झाल्याचे चित्र होते. तरीही नमते घेऊन शिवसेनेनेवर आम्ही कोणीही टीका करणार नाही, असे आव्हाड यांनीच सांगितले होते. परंतु, त्यानंतर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रभाग रचनेवरून पुन्हा कळवा, मुंब्रा आणि दिव्याच्या मुद्यावरून अप्रत्यक्षपणे का होईना आव्हाडांना थेट टार्गेट केले. त्यामुळे आघाडीत पुन्हा ठिणगी पडली. त्यातूनच शनिवारी कळव्यात झालेल्या जलकुंभाच्या लोकार्पणाच्या दिवशीदेखील आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका करताना हाडे मोडण्याची भाषा केली.
त्यानंतर आव्हाड यांनी आता थेट कोपरी पाचपाखाडी या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात जाऊन अप्रत्यक्षरित्या त्यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. कार्यालय हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी असते. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्य होण्याची संधी आपणाला जनसंपर्क कार्यालयातून मिळते, असे आव्हाड यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रदेश चिटणीस सुहास देसाई उपस्थित होते.