अनिकेत घमंडीडोंबिवली : केडीएमसी भाजपाचे कधी नव्हे ते ४२ नगरसेवक निवडून आले आहेत. ३० नगरसेवकांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. लोकांनी दिलेल्या संधीचे सोने करा, जनसंपर्क वाढवा, रस्त्यावर फिरा, नागरिकांशी चर्चा करा, लोकांना दिलेली वेळ पाळा, अशा शब्दांत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली.
सावित्रीबाई फुले रंगमंदिरात चव्हाण यांनी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. तुमच्या मतदारसंघातील तसेच शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावा, जनताभिमुख व्हा, असे चव्हाण म्हणाले. त्यांनी डोंबिवलीतील नगरसेवकांच्या कामांचे प्रगतीपुस्तक वाचून दाखवले. नागरिकांनी संधी दिली, याचा अर्थ आपण कसेही वागावे, असा होत नसून जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे, असे नमूद करून चव्हाण म्हणाले की, गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीच्या कार्यक्रमालाही ठिकठिकाणांहून विद्यार्थी आले होते. परंतु, कल्याण-डोंबिवलीतून नगरसेवक गेले नाहीत. भाजपा जनताभिमुख कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे जरी महापालिकेची निवडणूक जिंकणे सोपे झाले असले, तरी आता प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डात किती सकारात्मक कामे केली, हे तपासणेही महत्त्वाचे आहे. मतदार एकदा निवडून देतात, पण त्यानंतर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे, हे संबंधित नगरसेवकांचे काम आहे.साधी वेळ पाळणे, हे देखील अनेकांना जमत नाही, जनसंपर्क नाही, असे चालणार नाही. यापुढे नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवा, अन्यथा पक्षस्तरावर त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट बजावले.रस्ते, पाणी, वीज, स्वच्छतेच्या समस्या सोडवाकल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाप्रेमींमुळे पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य आहे. नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करा. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता, महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांकडून विद्युतसमस्या, अभियंत्यांकडून रस्ते आणि पाण्याचे समसमान वितरण अशा नियोजनाच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे. यासाठी आपला जनसंपर्क, अभ्यास आणि आत्मीयता सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे चव्हाण म्हणाले. यापुढे प्रत्येक नगरसेवकाने काय काम केले, त्याचा लेखाजोखा स्वत: ठेवावा. पक्षपातळीवर आमचे लक्ष निश्चितच आहे. एकदा चूक निदर्शनास आणत आहे. त्यातूनही सुधारणा न झाल्यास मात्र नंतर जे परिणाम होतील, त्याला सामोरे जा, अशी तंबी त्यांनी दिली.