कल्याण : भाजपा सरकारने वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्रीपद दहावी पास असलेले डोंबिवलीतील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. ते वैद्यकीय शिक्षणाचे प्रश्न कसे सोडविणार, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्याचबरोबर अन्य एक मंत्र्यांची डिग्रीच डुप्लिकेट आहे, असे सांगत त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
पूर्वेतील चक्कीनाका येथील मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेनिमित्त जाहीर सभा घेतली. याप्रसंगी पवार यांनी उपरोक्त वक्तव्य केले. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, एमआयएमला भाजपाने प्रमोट केले आहे, असे वक्तव्य मंत्रिमंडळातील रामदास आठवले यांनी केले आहे. त्यावरून कोरेगाव भीमाची दंगल का झाली. त्याला कोण जबाबदार होते, असा सवाल उपस्थित करत पवार यांनी दंगलीला भाजपा कारणीभूत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या का घडल्या. साहित्य संमेलनात काय घडले, याला जबाबदार कोण, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
फडणवीस सरकारने आर्थिक शिस्त बिघडवून टाकली आहे. समृद्धी महामार्गातील बाधितांना तीन हजार १४५ कोटी नुकसानभरपाई दिली. त्यासाठी एमआयडीसीतून ३०० कोटी, म्हाडातून १ हजार कोटी, एसआरएतून ६०० कोटी, एमएमआरडीएतून ५०० कोटी, सिडकोतून ६०० कोटी आणि एमएसआरडीसीतून ३०० कोटी रुपये घेतले. या संस्थांच्या प्रकल्पासाठी कुठून पैसा आणणार, असा प्रश्न आहे, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.मोदींविरुद्ध संविधान अशी लढाई-भुजबळभुजबळ म्हणाले, ‘भारतीय संविधानावर घाला घालण्याचे काम भाजपाने मोदींच्या रूपाने केले आहे. त्यामुळे २०१९ मधील निवडणूक ही मोदी विरुद्ध संविधान, अशी आहे. सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसा नाही. मात्र, रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधा लावण्यासाठी ‘गुगल’ला देण्याकरिता साडेचार लाख कोटी रुपये आहेत.’