डोंबिवली : रिक्षाचालकांच्या मुजोरीचा सामना प्रवाशांना करावा लागत असतानाच मद्यधुंद अल्पवयीन मुले रिक्षा चालवत असल्याने डोंबिवलीत रिक्षाप्रवास धोकादायक झाला आहे. बहुतांश ठिकाणी हे चित्र दिसत असले, तरी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.
रिक्षाचालकाकडे परवाना आणि बॅज बंधनकारक असताना काही रिक्षामालक या गोष्टी नसलेल्या चालकांना रिक्षा चालवण्यासाठी देत आहेत. त्यामुळे १५-१६ वर्षांची मुले हाफ पॅण्टमध्ये रिक्षा चालवताना दिसतात. गुटखा, पान, मावा खाणे, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसन, उद्धट वागणुकीबरोबर मनमानी भाडे ते आकारत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वागणुकीमुळे रिक्षाव्यवसायही बदनाम होत आहे. आता पूर्वेतील एका चौकात रस्त्यामध्ये रिक्षा उभी करून एक मुलगा बीअर पीत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कल्याणमध्ये काही दिवसांमध्ये स्टेशन परिसरात अनेक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली होती. तशी कारवाई डोंबिवलीमध्येही करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. मात्र कारवाई सुरू असल्याचा दावा आरटीओ आणि वाहतूक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.