मीरारोड - मीरा भाईंदर मध्येमुसळधार पावसाने अनेक इमारतींच्या भूमिगत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यां मध्ये दूषित पाणी शिरले . त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्या द्वारे आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी महापालिकेने नागरिकांना मोफत क्लोरीन पावडर वाटप चालवली आहे .
गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर मध्ये पूरस्थिती निर्माण झाली . त्यातही २७ जुलै रोजी तर शहरात पुराचा अनुभव लोकांनी घेतला . पाणी तुंबल्याने इमारतींच्या भूमिगत पाण्याच्या टाक्यां मध्ये दूषित पाणी शिरले. त्यामुळे इमारतीतील रहिवाश्याना दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती . आयुक्त दिलीप ढोले यांनी या प्रकरणी शहरातील ज्या इमारतीच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाकीत पावसाचे पाणी शिरले अशा इमारतींचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले .
त्यात काही इमारतींच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाकीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. पाणी पुरवठा विभागातील अभियंते यांच्यामार्फत सदर इमारतीतील पदाधिकाऱ्यांना इमारतीतील टाक्या स्वच्छ करून घेण्याकरीता क्लोरीन पावडर पुरवठा करण्यात आली. भूमीगत साठवण टाक्या साफ केल्यानंतर वितरण व्यवस्थेतील पाणी पुरवठ्याच्या झोनद्वारे सदर इमारतीत पाणी पुरवठा करण्यात आला. तर ज्या इमारतींचा पाणी वितरणाचा झोन उशीरा आहे तशा इमारतींना टँकर पुरवठा करण्यात आला आहे. प्रत्येक ऊंच जलकुंभावर शहरातील प्रत्येक नागरीकाच्या सुरक्षेकरीता क्लोरीनची तपासणी होत आहे असे पाणी पुरवठा व मलनिःसारण विभागचे कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांनी सांगितले.