भाईंदर : मीरा-भार्इंदर पालिकेतील एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणा-या अधिका-यांच्या बदलीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी ५ वा दिवस ठरला. मात्र आंदोलकांना प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीचे आश्वासन अद्याप न मिळाल्याने शिवसैनिकांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची गाडी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अडवून त्यांना घेराव घातला. सैनिकांनी आयुक्तांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी केली.उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी वीरकर यांची १७ डिसेंबरला भेट घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने वीरकर यांनी आंदोलन सुरूच ठेवले. प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यानेआंदोलकांनी पालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाºयांचे प्रतिकात्मक बैलांचे पुतळे तर त्या अधिकाºयांच्या बदल्यांसाठी कोणतीही कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ ढिम्म प्रशासनाचा प्रतिकात्मक कासवाचा पुतळा आंदोलनाच्या ठिकाणी ठेवला आहे. त्यांच्या गळ्यात त्या-त्या विभागांच्या पाट्या लटकवल्या आहेत.आयुक्तांची गाडी पालिका मुख्यालयाबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. यामुळे सुरूवातीला तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली. आंदोलकांनी आयुक्तांना गाडीबाहेर पडण्यास भाग पाडून त्यांना जाब विचारण्यासाठी घेराव घातला. त्यावेळी आंदोलकांनी आयुक्तांना फुले देत गांधीगिरी केली.आयुक्तांनीही आंदोलकांची भूमिका समजून घेतली. यानंतर त्यांनी वीरकर यांना चर्चेसाठी आपल्या दालनात आमंत्रित केले. त्यावेळी आयुक्तांनी वीरकर यांची मागणी रास्त असल्याचे स्पष्ट करून त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांना दिले. तत्पूर्वी त्या अधिकाºयांच्या अधिकारात कपात करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पुन्हा ये रे माझ्या मागल्याचा प्रकार होणार असल्याने वीरकर यांनी आयुक्तांचे आश्वासन अमान्य करत आंदोलन सुरूच ठेवले.
मीरा-भार्इंदर: शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांची गाडी अडवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:40 AM