भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा २० धोकादायक इमारती जाहीर केल्या असल्या, तरी पालिकेच्या पाहणीमध्ये तसेच संरचनात्मक तपासणी अहवालानंतर तब्बल ९४९ इमारती देखभालीअभावी सुस्थितीत नसल्याने दुरुस्ती करून घेण्यास बजावले आहे. तर, दुरुस्ती न केल्यास होणाऱ्या दुर्घटनेस जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.यंदाच्या वर्षी महापालिकेने २० इमारती धोकादायक असल्याचे जाहीर करून त्या पाडण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यातील अवघ्या सहा इमारतीच रिकाम्या करण्यात आल्या असून उर्वरित इमारतींमध्ये रहिवासी राहत असून काही न्यायप्रविष्ट आहेत. तर, ज्या इमारती धोकादायक यादीत नाहीत, त्यांचेही स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटना सतत घडत आहेत. यामध्ये काहींना जीव गमवावा लागला आहे, तर काही जण जखमी झाले होते. शिवाय, रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले होते.शहरातील इमारती सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी पालिकेने खाजगी अभियंते नेमून संरचनात्मक तपासणी करून घेतली होती. परंतु, त्यातील अनेक इमारतींनी नियमितपणे दुरुस्तीच केली नाही. दुसरीकडे राजकीय हस्तक्षेप आणि पालिकेचे दुर्लक्ष यामुळे काटेकोर अंमलबजावणीच झाली नाही.धोकादायक यादीत नसलेल्या इमारतींचे स्लॅब आदी कोसळून दुर्घटना वाढू लागल्यानंतर आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या निर्देशानुसार कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी बांधकाम विभागाच्या प्रभाग समितीनुसार सहा कनिष्ठ अभियंत्यांना जुन्या व धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्यास सांगितले होते. निवडणुकीची आचारसंहिता व कामाची व्याप्ती पाहता विलंबाने का होईना, पण कनिष्ठ अभियंत्यांनी पाहणी केलेल्या इमारतींची यादी विभागास सादर केली आहे.एकूण १५०९ इमारतींची पाहणी करण्यात आली होती. त्यापैकी ९४९ इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचे अहवाल महापालिकेस प्राप्त झाले.भार्इंदर पूर्व भागात सर्वात जास्त ९७७ इमारतींपैकी २२४ इमारती, भार्इंदर पश्चिम भागात २९३ इमारतींपैकी २५२ इमारती, तर मीरा रोड पूर्व भागात ५७६ पैकी ४७३ इमारतींच्या अहवालानंतर त्यांना आवश्यक दुरुस्ती करून घेण्याबाबत आयुक्तांच्या आदेशानंतर खांबित यांनी नोटिसा बजावल्या आहेत.इमारत प्रथमदर्शनी पाहणीमध्ये तिची व्यवस्थित दुरुस्ती केली नसल्याचे आढळल्याने तिची तातडीने दुरुस्ती करून घेण्यास सांगितले आहे.प्रतिसादाकडे लागले लक्षइमारतीचा स्लॅब वा भाग कोसळून मनुष्यहानी झाल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार गुन्हा दाखल करू, असा इशारा खांबित यांनी दिला आहे. पालिकेने इमारतींची दुरुस्ती करून घेण्यास कळवले असले, तरी त्याला लोकांचा प्रतिसाद किती मिळतो, हे अंमलबजावणीचा आढावा घेतल्यावर स्पष्ट होणार आहे.
मीरा-भार्इंदर पालिकेची ९४९ इमारतींना नोटीस, फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:36 AM