मीरा-भार्इंदर काँग्रेसची विभागवार मोर्चे बांधणीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 08:04 PM2018-02-25T20:04:34+5:302018-02-25T20:04:34+5:30
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने शहरात आपले राजकीय वलय निर्माण करण्यासह पालिकेतील भाजपा सत्ताधा-यांच्या भूलथापांपासून नागरीकांचा बचाव करण्यासाठी...
भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने शहरात आपले राजकीय वलय निर्माण करण्यासह पालिकेतील भाजपा सत्ताधा-यांच्या भूलथापांपासून नागरीकांचा बचाव करण्यासाठी जनजागृती मोहिम राबविण्यासाठी शनिवारपासून विभागवार मोर्चेबांधणीला सुरुवात केली.
स्थानिक नेतृत्व माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या मोर्चेबांधणीचा शुभारंभ नयानगर येथील गंगा निवास परिसरातून करण्यात आला. त्यात नवीन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीला सुरुवात करण्यात येऊन त्यांना मतदान केंद्र स्तरावरील पदाधिकारी नेमणूकीचे अधिकार प्रदान करण्यात आले. केंद्र स्तरावरील पदाधिका-यांना सत्ताधारी भाजपाने केलेल्या करवाढीबाबत नागरीकांत जनजागृती करण्यासह त्याला सतत विरोध करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. यावर कांग्रेसच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील पदाधिका-यांच्या कामावर नियंत्रण ठेवून उर्वरीत प्रभागांतील ब्लॉक अध्यक्षांनी त्यावर नियंत्रण ठेवून त्यांना सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले. सर्व नगरसेवकांसह पदाधिका-यांना पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शहरात काँग्रेसचे अधिकाधिक वलय निर्माण व्हावे, यासाठी सामान्य नागरीकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सामाजिक अडचणी जाणून घ्याव्यात. तसेच त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्यांना सहकार्य करणे व त्यांचा संपर्क कायम ठेवणे आदी सल्ले देण्यात आले. पदाधिका-यांच्या नियुक्तीच्या मोहिमेचा शूभारंभ झाला असला तरी सध्या दोन विभागांमध्येच पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उर्वरीत विभागांतही हि मोहिम सुरु करण्यात येणार असुन काँग्रेसला घराघरात पोहोचविण्याचे उद्दिष्ट शहर कमिटीचे असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले. सत्ताधा-यांकडुन नागरीकांची दिशाभूल केली जात असुन त्यांच्या गैरकारभाराला नेस्तनाबूत करण्यासाठीच काँग्रेसचा हल्लाबोल सुरु केला जाणार असल्याचे सांगुन प्रसंगी समविचारी पक्षांना सोबत घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदाधिका-यांच्या पक्षकार्याचा आढावा सतत घेण्यासाठी समितीची देखील स्थापना करण्यात येणार असुन समितीमार्फत पदाधिका-यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार असलयचेही त्यांनी सांगितले. या मोहिमेच्या शुभारंभावेळी माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेते जुबेर इनामदार, शहर पदाधिकारी अंकुश मालुसरे, प्रदेश सचिव सुरेश दळवी, नगरसेवक अश्रफ शेख, राजीव मेहरा, नगरसेविका मर्लिन डिसा, सारा अक्रम आदी उपस्थित होते.