मीरारोड - मीराभाईंदर शहरासाठी मंजूर असलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणी योजनेतील ४० दशलक्ष लीटरच पाणी शहराला मिळत असल्याने उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी १० जुलैपासून देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्याची माहिती महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी दिली. या शिवाय जुलै पासून २० टक्के पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची तीव्र टंचाई असल्याने नवीन नळजोडण्या देणे बंद करण्यात आले होते. काँग्रेस आघाडी शासनात उद्योगमंत्री असताना नारायण राणे यांनी एमआयडीसीच्या कोट्यातून मीरा भार्इंदर करीता ७५ दशलक्ष लीटर पाणी राखीव ठेवले होते. भाजप-सेना युती शासन काळात योजना पूर्ण होऊन २०१७ पासून एमआयडीसीचे ७५ पैकी ४० दशलक्ष लीटर पाणी मिळू लागले. त्यामुळे नळजोडण्या देण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली.परंतु उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर पुनर्वसन आदी मुद्द्यांमुळे मिळत नव्हते. पुनर्वसनाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आ. मेहतांनी उद्योगमंत्री व जलसंपदामंत्री यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली होती. मंगळवारी देसाई व महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आ. मेहतांसह महापौर डिंपल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे आदी उपस्थित होते. महापौर व आमदार यांनी देसाई व महाजन यांचे आभार मानले आहेत.
मीरा-भार्इंदरची २० टक्के पाणीकपात रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 1:10 AM