- राजू काळेभार्इंदर- मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी हॉटेल सी अँड रॉकमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी नवीन मंडळांतून सक्रिय अध्यक्षांना डच्चू देत त्यावर नव्या चेह-यांची वर्णी लावण्यात आल्याने पदमुक्त केलेल्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे ते बंडाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा भाजपात रंगू लागली आहे.भाजपातील वरिष्ठांसह प्रदेश स्तरावरून कोणताही आदेश वा निर्देश नसताना स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी शहरातील भाजपाच्या मंडळाची संख्या कमी केल्याचा दावा नाराजांकडून केला जात आहे. तसेच त्यात फेरबदल करण्याऐवजी त्यांनी त्यातून सक्रिय अध्यक्षांना पदाधिका-यांना डच्चू देत मर्जीतील नवीन चेह-यांना संधी दिल्याचा आरोप नाराज झालेल्यांकडून केला जात आहे. यामुळे भाजपाने पालिका निवडणुकीतील बहुमतासाठीच आपला वापर केल्याची भावना नाराजांमध्ये निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.तत्पूर्वी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाल्याने शहरातील भाजपा मंडळांकडून पक्षाचे प्रभावी कार्ये होत नसल्याचा सूर वरिष्ठ स्तरावरून आळवला जात असल्याने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे येथे मीरा-भार्इंदरमधील भाजपा पदाधिका-यांची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी सर्व पदाधिका-यांची झाडाझडती घेत शहरातील पक्षाचे कार्य चांगले सुरू असून निवडून आलेले लोक देखील पालिकेत चांगले काम करीत असल्याची स्तुती केली.परंतु समाजातील विविध घटकांसाठी काम करणारी मंडळे मात्र पक्षाचे प्रभावीपणे काम करीत नसल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावेळी काही मंडळांचे अध्यक्ष अनुपस्थित राहिल्याचेही त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांची विचारणा केली. अशातच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसह पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पालिकेत निवडुन आलेल्या प्रत्येक नगरसेवकासह पदाधिका-यांना एकेका केंद्राची जबाबदारी देण्याची सूचना आ. मेहता यांना केली. याशिवाय भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पन्ना प्रमुख ही संकल्पना अंमलात आल्याची माहिती देत प्रत्येक मतदार यादीतील एका पानावरील मतदारांची जबाबदारी नियुक्त केलेल्यांना देण्याचे निर्देश त्यांनी मेहता यांना दिले.त्यानुसार मेहता यांनी मंगळवारी ११ वाजता घोडबंदर मार्गावरील हॉटेल सी अँड रॉकमध्ये पक्षातील काही पदाधिका-यांची बैठक बोलवली होती. त्यात जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, माजी नगरसेवक आसिफ शेख, अनिल भोसले आदींचा समावेश होता. त्यावेळी शहरात कार्यरत असलेल्या १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्यात आली. तसेच या नवीन मंडळांवरून सक्रिय अध्यक्षांची उचलबांगडी करून त्यावर नव्यांना व मर्जीतील चेह-यांना संधी देण्यात आल्याचा आरोप डावललेल्यांनी केला आहे.ज्यांना मंडळांची जबाबदारी देण्यात आली आहे ती प्रभारी असून त्यावर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त नवीन प्रभारींना देण्यात आलेल्या जबाबदारीनुसार त्यांनी आपल्या मंडळातील कार्यकर्ते व पदाधिका-यांची बैठक बोलावून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे कार्य करणार आहेत. प्रंसगी स्थानिक स्तरावर त्याचा निर्णय घेतला जऊन नवीन नियुक्त्या केल्या जातील.- उपमहापौर चंद्रकांत वैतीज्यांना मंडळ अध्यक्षपदावरून मुक्त केले त्यातील काहींनी मला संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. या व्यतिरिक्त त्यावर कोणतीही सविस्तर चर्चा झाली नाही.- माजी महापौर गीता जैननुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पक्ष हिताच्या दृष्टीने काही मंडळांत फेरबदल करण्यात आला. यात संबंधित पदाधिका-यांनी केलेल्या पक्ष कार्याचे मूल्यमापन करूनच फेरबदलाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मीरा-भार्इंदरमधील भाजपाची मंडळे झाली कमी; नवीन मंडळांत जुन्यांना डावलुन नव्यांना संधी दिल्याने नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 6:06 PM