मीरा रोड/भार्इंदर : आॅनलाइन यंत्रणा हाताशी असूनही नेटवर्कचा प्रश्न आणि सॉफ्टवेअर हाताळणीतील गोंधळामुळे आदल्या दिवशीच्या राजकीय शिमग्यानंतर पालिकेच्या शिमग्याचा दुसरा अंक गुरूवारी पाहायला मिळाला. रिंगणातील उमेदवारांची नेमकी संख्या, पक्षनिहाय उमेदवार, माघार घेतलेल्यांचा तपशील रात्री उशिरापर्यंत मिळत नव्हता. उमेदवारांचे शिक्षण, संपत्ती, गुन्हे याबाबतची प्रतिज्ञापत्रेही उपलब्ध न झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. यातून पालिकेच्या गलथान कारभाराची चर्चा पुन्हा सुरू झाली.भाजपामध्ये एबी फॉर्म वाटपासह उमेदवारीवरुन मोठी बंडाळी माजल्याने आणि छाननीचा अंदाज घेतल्यावर गुरूवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर झाली.भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील यांचा त्यांच्या पारंपरिक प्रभागातून पत्ता कापण्यात आल्यानंतर शेवटच्या क्षणी त्यांना प्रभाग १८ मधून उमेदवारी दिली. तेथे भाजपाने आधीच विजय राय यांना उमेदवारी व एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे भाजपाची राय यांना शोधण्यासाठी तारांबळ उडाली. पण त्यांचा संपर्कच होऊ शकला नाही. राय यांचा अर्ज आधी भरलेला असल्याने पाटील यांचा अर्ज नाकारण्यात आला व राय यांना भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. शरद पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ व निष्ठावंत नगरसेवकाला या पद्धतीने दिलेल्या या अपमानास्पद वागणुकी बद्दल भाजपात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पाटील यांना उमेदवारी नाकारत केलेल्या टोलवाटोलवीबद्दल चर्चा रंगली आहे.भाजपाने प्रभाग २० मधून दिनेश जैन व भावेश गांधी या दोघांना एबी फॉर्म दिले असले, तरी जैन यांचा अर्ज आधी आल्याने गांधी अपक्ष ठरले. वास्तविक जैन यांचा पत्ता कापण्याचा प्रयत्न आधी पण झाला होता. प्रभाग ७ मध्ये रक्षा भुपतानी यांनी आधी अर्ज व एबी फॉर्म भरल्याने रोहिणी कदम यांचा पत्ता कापल्याची चर्चा आहे.महापौर तथा प्रभाग ६ च्या भाजपा उमेदवार गीता जैन यांनी शिवसेनेच्या प्रमिला राजू शाह यांच्या मालमत्तेबद्दल हरकत घेतली. पण सुनावणीला जैन आल्याच नाहीत. प्रभाग ८ मध्ये माजी महापौर तथा सेना उमेदवार कॅटलीन परेरा यांच्याविरुध्द भाजपाच्या दिपाली मनोज कापडिया यांनी मालमत्ता दाखवली नाही, तसेच नगरसेवक म्हणून मानधन घेतल्याची रक्कम प्राप्तिकरात दाखवली नाही, म्हणून हरकत घेतली. पण परेरा यांनी त्याचे स्पष्टीकरण दिल्यावर त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला. प्रभाग ८ मध्येच भाजपाचे उमेदवार सुरेश खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्जात तीन अपत्याची व दुसºया पत्नीची माहिती दडवल्याची हरकत सेना उमेदवारातर्फे माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी घेतली. भाजपाच्या प्रभाग २० च्या उमेदवार डॉ. नयना वसाणी व नगरसेवक अश्विन कासोदरीया यांनी त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांतील कलमे दडवल्याने राष्ट्रवादीच्या सीमा जैन व सेनेच्या दिप्ती भट यांनी हरकत घेतली. त्यावरुन खडाजंगी झाली. प्रभाग १६ मध्ये भाजपा नगरसेवक परशुराम म्हात्रे यांनी सेनेचे नीलेश पाटील २०१० साली ठेकेदार असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली. तर परशुराम यांना एका गुन्ह्यात शिक्षा झाली असून ती माहिती न दिल्याने त्यांना बाद करा, अशी मागणी सेनेच्या उमेदवारांनी केली. पण त्या फेटाळल्या गेल्या.
मीरा-भार्इंदर निवडणूक : आता पालिकेचा शिमगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:00 AM