मीरा रोड - आॅगस्टमध्ये बरखास्त केलेली मीरा-भार्इंदर मनसेची मुख्य तसेच महिला आघाडीची कार्यकारिणी नव्याने जाहीर करण्यात आली आहे. १९ जणांची मुख्य कार्यकारिणी, १७ विभाग अध्यक्ष तर १४ जणींची महिला आघाडीची कार्यकारिणी आहे. महिला आघाडीत एक उपजिल्हाध्यक्ष व दोन शहर अध्यक्ष केले आहेत. नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असली तरी अंतर्गत धुसफूस मात्र कायम असल्याचे समजते.मीरा-भार्इंदर मनसे संघटनात्मक व नेतृत्वाच्या दृष्टीने कमकुवत असताना अंतर्गत वादविवाद सुद्धा टिपेला पोहोचले आहेत. एखादा विषय घेण्यावरून सुद्धा वाद होत आले आहेत. तर शहरात अनेक गंभीर समस्या असताना असे विषय टाळण्यासह घेतलेल्या विषयांचा पाठपुरावा करून ते तडीस लावले जात नाहीत. सत्ताधा-यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात नाही. मोकळेपणाने काम करू दिले जात नाही अशा तक्रारींचा सूर मनसैनिकांकडूनच सुरू आहे. या वादातून मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजगढाच्या निर्देशानुसार आॅगस्टमध्ये मनसेची कार्यकारिणी बरखास्त केली होती.आता नव्याने मनसेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या सह १९ जणांची मुख्य कार्यकारिणी तर १७ विभाग अध्यक्ष नियुक्त केले गेले आहेत. हेमंत सावंत यांना भार्इंदर शहर संघटक, दिनेश कनावजे यांना मीरा रोड शहर संघटक तर शशी मेंडन यांना मीरा-भार्इंदर विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी बढती दिली आहे. सचीव पदी नरेंद्र पाटोळे यांची पुन्हा वर्णी लागली आहे. भार्इंदर पश्चिमेसाठी उप शहराध्यक्षपदासाठी कोणीच सक्षम नसल्याने ते रिक्त ठेवले आहे. तर प्रमोद देठे, सतीश जाधव व नागेश कासार यांनी मात्र सह सचिवपद नाकारले आहे.महिला आघाडी उप जिल्हाध्यक्ष पदी पुत्तुल अधिकारी यांना नियुक्त केले आहे. दोन शहर अध्यक्षा केल्या असून, अनू पाटील यांना ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्र तर सोनिया फर्नांडिस यांना मीरा-भार्इंदर विधानसभा क्षेत्र दिले आहे.
मीरा-भार्इंदर मनसेची कार्यकारिणी जाहीर; अंतर्गत धुसफूस कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 3:00 PM