- धीरज परब मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये शिधावाटप विभागात अवघे १७ कर्मचारी आणि १२१ शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून शिधावाटपाचे काम करत आहेत. आतापर्यंत शहरातील २ लाख ३८ पैकी ८७ टक्के लाभार्थ्यांना १७ लाख ५१ हजार ७१० किलो इतके तांदूळ व गहू वाटप करण्यात आले. तर मे पासून २ लाख ५२ हजार केशरी कार्डधारक लाभार्थ्यांनाही धान्य वाटप केले जाणार आहे.धान्य घेण्यासाठी शिधावाटप दुकानाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच काही नगरसेवक, कार्यकर्ते यांना त्यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यास दिले नाही म्हणून फुगल्याने कांगावे करत सुटले आहेत. तर धान्य वाटपाची आकडेवारी ही आॅनलाइनही पाहता येत असून बायोमेट्रिकद्वारे धान्य वितरण होत असल्याने कांगावे बिनबुडाचे ठरत आहेत. शिधावाटप विभागात २० कर्मचारी असून त्यातील १७ कर्मचारीच सध्या कामा वर येत आहेत. काही महिला कर्मचारी तर केळवे, वसई आदी भागातून रोज दुचाकीने जीव धोक्यात घालून कामावर येत आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग त्यात १२१ शिधावाटप दुकानांमध्ये धान्य वाटपाचे नियोजन करणे अवघड जात आहे. नागरिकांकडून धान्यासाठी मोठी गर्दी केली जात असल्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.अन्न सुरक्षा योजनेतील ५२ हजार शिधापत्रिका असून २ लाख ३८ हजार इतके लाभार्थी आहेत. आतापर्यंत या लाभार्थ्यांना ५ लाख ९६ हजार ६४५ किलो गहू व ४ लाख ९ हजार ९०० किलो तांदळाचे वाटप केलेले आहे. या शिवाय प्रती माणशी ५ किलोप्रमाणे ७ लाख ४५ हजार १६५ किलो तांदूळ मोफत देण्यात आला आहे. ८७ टक्के लाभार्थ्यांना आतापर्यंत धान्य वाटप झालेले असून एप्रिल संपायच्या आत यात आणखी वाढ होणार आहे. ज्यांच्या शिधावाटप पत्रिका आधारशी लिंक झालेल्या नाहीत त्यांनाही मे महिन्यापासून धान्य मिळणार असल्याचे शिधावाटप अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या ५४ हजार इतकी असून २ लाख ५२ हजार लाभार्थी आहेत. त्यांनाही मे व जूनसाठी प्रती माणशी ३ किलो गहू ८ रुपये दराने तर २ किलो तांदूळ १२ रुपये दराने दिले जाणार आहेत.सबळ पुराव्यासह तक्रारी कराव्यातसरकारकडून आवश्यक धान्यसाठा येत असून सर्वच लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य मिळणार आहे. परंतु, नागरिकांनी गर्दी न करता प्रशासन व शिधावाटप दुुकानदारांना सहकार्य करावे. धान्यवाटपाबद्दल कोणत्या तक्रारी असतील, तर त्या सबळ पुराव्यांसह दिल्या जाव्यात, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये १७ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर १२१ दुकानांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:45 PM