मीरा रोड - भाजपा प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या मीरा भाईंदर जिल्हाध्यक्षा विरोधात माजी आमदार व त्यांच्या समर्थकांनी आघाडी उघडली असताना मीरा भाईंदर भाजपातील जुनीजाणत्या ज्येष्ठ मंडळीनी मात्र प्रदेशाध्यक्ष यांचा निर्णय मान्य असल्याची भूमिका घेतली आहे. एकाधिकारशाही व व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्षाचा वापर यापुढे खपवून घेणार नाही असा निश्चय केल्याने मेहता व समर्थकांना चपराक मानली जात आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीरा भाईंदर भाजप जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती केली आहे. व्यास यांच्या नियुक्तीवरून माजी आमदार नरेंद्र मेहता व समर्थकांनी जोरदार विरोध करत प्रदेश नेतृत्व विरोधातच दंड थोपटले आहेत. आम्हाला कोणाला न विचारताच पक्षाने जिल्हाध्यक्ष नेमला आहे. त्याचा फेरविचार झाला नाही ही तर पुढची दिशा ठरवू असा इशाराच पक्षनेतृत्वाला देण्यात आला आहे. मेहता यांनी तर भाजप मंडळांच्या बैठका देण्याचा सपाटा लावला आहे. परंतु पक्षनेतृत्वाने मेहता व समर्थकांच्या दबावाला अद्याप तरी बळी न पडता जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा निर्णय कायम ठेवला आहे.
दरम्यान भाजपच्या स्थापनेपासून तसेच गेली अनेक वर्षे भाजपात सहभागी असलेल्या काही जुन्या-जाणत्या ज्येष्ठ मंडळींनी मंगळवारी भाईंदरच्या शंकरनारायण महाविद्यालयात बैठक घेतली. सुमारे २ तास चाललेल्या या बैठकीस स्थानिक भाजपचे ज्येष्ठ नेते नगरसेवक रोहिदास पाटील, माजी नगरसेवक गजानन भोईर, केसरीनाथ म्हात्रे, राजेंद्र मित्तल, श्याम मदने आदी भाजपची अन्य काही ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती.
बैठकीत मीरा भाईंदर भाजपातील गेल्या काही वर्षातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पक्षाने दिलेल्या जिल्हाध्यक्ष सोबत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपा ही कोणा व्यक्तीची मक्तेदारी व मालमत्ता नाही. कोणी भाजपाचा वापर स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी करत असेल व पक्षाला आणि पक्ष शिस्तीला आव्हान देत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही या पद्धतीचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला गेला असे सूत्रांनी सांगितले.
जनतेला भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ प्रशासन मिळायला हवे. एकाधिकारशाहीला आळा घातला गेला पाहिजे. जुन्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत भाजपाची विचारधारा व पक्ष पुढे नेण्याचे काम स्वतःचे आयुष्य वेचून केले आहे. अशा ज्येष्ठांना डावलून चालणार नाही. शहराच्या हितासाठी भाजपाची मूळ विचारधारा व पक्ष अधिक बळकट करण्याचा निश्चय या ज्येष्ठांनी बैठकीत व्यक्त केला. शहरातील जुन्या-जाणत्या भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय केले जाणार असून शहर व पक्ष हितासाठी अशा बैठका नियमितपणे घेतल्या जाणार असल्याचे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली .