लोकमत न्यूज नेटवर्कमीरा राेड : भाईंदरच्या इंद्रलोक येथील तपोवन विद्यालय इमारतीत भिनमाल जैन संघच्या पुढाकाराने तसेच आमदार गीता जैन यांच्या सहकार्याने १२५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या कोरोना रुग्णालयात नागरिकांवर मोफत उपचार व सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.
भिनमाल जैन संघाचे मुकेश वर्धन आणि सहकारी यांनी सांगितले की, मुंबईमध्ये २ ठिकाणी कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. मीरा भाईंदरमध्येसुद्धा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तपोवन विद्यालय इमारतीत १२५ खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात आले असून त्याचे उदघाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी करण्यात आले. गरज पडली तर भाईंदरसाठी आणखी एक उपचार केंद्र सुरु करू.१२५ खाटांच्या रुग्णालयात ७५ खाटा ऑक्सिजन सुविधेच्या असाव्यात असे प्रयत्न सुरु आहेत. हे रुग्णालय सर्व समाजातील नागरिकांना खुले आहे. सर्वांना उपचार, जेवण आदी सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सरकार प्रयत्न करतेय, त्यांच्या मर्यादा आहेत म्हणून जैन समाज नेहमीप्रमाणेच मदतीसाठी पुढे आला आहे. कोरोना संकट काळात जैन समाज सर्वांसोबत आहे . खाटा नाहीत किंवा ऑक्सिजन नाही म्हणून कोणी रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी उपचार केंद्रे सुरु करत आहोत असे मुकेश वर्धन म्हणाले.
भन्साळी उद्योगाचे बाबूलाल भन्साळी, भिनमाल जैन संघ, वर्धमान संस्कारधाम, सचोरी ग्रुप मंडळ, तपोवन विद्यालय आदींनी या रुग्णालयासाठी योगदान दिले आहे. या प्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक व गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी भिनमाल जैन संघासह सहयोगी जैन समाजाच्या संस्थांचे कौतुक केले. कोरोनाच्या महामारीत समाजाने नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी घेतलेला पुढाकार कोरोना विरोधातील लढ्याला आणखी बळ देणारा असल्याचे खा. विचारे म्हणाले.
मेहतांच्या राजकीय उद्घाटन नाट्यावर टीकाnरुग्णालय सुरु करण्यासाठी भिनमाल जैन संघ आदींनी तयारी दर्शवल्यावर खा. विचारे व आ. गीता जैन यांनी पालिका आयुक्तांना आवश्यक सहकार्य करण्याची सूचना केली. nआ. गीता जैन यांनी पुढाकार घेतला. लोकार्पणाचा कार्यक्रम आदल्या दिवशी जाहीर झाला होता. असे असताना माजी आमदार नरेंद्र मेहतांनी पालकमंत्री यायच्या आधी जाऊन फित कापली आणि उदघाटन केल्याचे सांगत फोटो सोशल मीडियावर शेअर केले. nपरंतु स्वतः मुकेश वर्धन यांनी उदघाटन पालकमंत्र्यांनी केल्याचे जाहीर करत राजकारणाला कात्री लावली. मेहतांचे हे राजकीय उदघाटन नाट्य निंदनीय असल्याची टीका विविध स्तरातून होत आहे.