- धीरज परब मीरारोड - रेल्वे तसेच प्रवासाची सोय नसल्याने नाईलाजास्तव कडक उन्हात पायी निघालेल्या 12 हजार लोकांना आता पर्यंत मीरा भाईंदर मधून एसटी बसने राज्याच्या सीमेवर मोफत सोडण्यात आले आहे . 281बस फेऱ्या झाल्या असून कष्टकरी गोरगरिबांना मोठा दिला मिळाला आहे .
कोरोना मुळे केंद्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केल्या नंतर मजूर , कामगार , रोजंदारीवर जगणारी कुटुंब तसेच अन्य अडकलेल्या लोकांसाठी मात्र रेल्वेची तसेच अन्य वाहनांची सुविधाच उपलब्ध करून देण्यात आली नाही . जेणे करून गोरगरीब व कष्टकऱ्यांना आपल्या मूळ गावी जाणे अशक्य झाले . ट्रेन बंद असल्याने लोकांनी ट्रक , रिक्षा , टेम्पो आदी वाहनं मधून शेकडो किलोमीटर असलेली आपल्या राज्यांची हद्द गाठली . वाहन चालकांनी देखील वाट्टेल तसे भाडे आकारून लूट केली .
परंतु पदरी पैसे नसणारे वा वाहनांची सोय नसणारे हजारो लोकं मीरा भाईंदर हद्दीतील मुंबई अहमदाबाद मार्गावरून चालत आपले गाव गाठण्यासाठी जात असत . लोकांचा हा जीवघेणा प्रवास पाहून अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य शासनाच्या एसटी बस राज्याच्या सीमे पर्यंत मोफत सोडण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने वरसावे नाका येथून 11 मे पासून मध्यप्रदेशच्या सीमे पर्यंत एसटी बस लोकांना मोफत सोडून येऊ लागल्या.
विभागीय वाहतूक अधिकारी आर . एच . बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाहतूक निरीक्षक भास्कर देवरे व सहकार्यांनी बस सोडण्याचे आवश्यक ते नियोजन केले . बस चालक देखील या कष्टकऱ्यांना वेळेत सोडून परत दुसऱ्या खेपेसाठी तयार असायचे . सामाजिक संस्था , महसूल , पोलीस आदींनी बसने जाणाऱ्या लोकांची तेथेच वैद्यकीय तपासणी करून सोबत जेवण , पाणी , बिस्कीट , फळं आदी दिले जाऊ लागले .
11 मे पासून 20 मे पर्यंत मध्यप्रदेशच्या सीमे पर्यंत 243 एसटीबस , छत्तीसगढ च्या सीमे पर्यंत 24 तर कर्नाटक सीमे पर्यंत 14 बस सोडण्यात आल्या असून एकूण 281 बस मधून सुमारे 12 हजार लोकांना मोफत नेण्यात आले आहे . दहिसर चेकनाका येथून रोज सकाळ पासून रात्री पर्यंत प्रवासी येतील त्या नुसार त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर मोफत सोडले जात आहे . पायी चालत जाणाऱ्यांना लालपरीने मोठा आधार देण्याचे काम न थांबता - थकता चालवले आहे .