लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर मधील दुकानदारांनी मराठी ऐवजी अन्य भाषेत लावलेल्या नामफलकांना शनिवारी मनसेने काळे फासले . पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून दुसरीकडे २४ तासात मराठीत नामफलक केले नाहीत तर आंदोलन सुरूच राहील असा इशारा मनसेने दिला आहे .
मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत, मनसे मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे व महिला विधानसभा अध्यक्षा निता घरत, उपशहर अध्यक्ष दृष्टी घाग, मनविसेचे शहरअध्यक्ष रॉबर्ट डिसोझा, शहर सचिव प्रकाश शेलार, उपशहर अध्यक्ष अभिनंदन चव्हाण, शेखर गजरे, विभाग अध्यक्ष भरत करचे, विजय भगत, माथाडी कामगार सेनेचे चंद्रशेखर जाधव, गणेश बामणे, सचिन साळुंखे , अभि खाडे, गौरव शिंदे आदी मनसैनिकांनी शनिवारी मराठी नामफलकांसाठी आंदोलन केले .
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट ते शिवार उद्यान पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानांच्या अमराठी नामफलकांना काळे फसले . यावेळी पोलीस देखील उपस्थित होते व त्यांनी मनसैनिकांना प्रतिबंधात्मक कार्यवाहीच्या नोटिसा बजावल्या .
सर्वोच्च न्यायालयाने व मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील जर मराठी भाषेत नामफलक लावले जाणार नसतील तर आंदोलना शिवाय पर्यंत नाही . महाराष्ट्रात राहून स्वतःची व कुटुंबाची पोटे भरायची आणि मराठी राजभाषेचा अपमान करायचा हे महापालिकेसह संबंधित प्रशासन व सरकार उघड्या डोळ्याने बघत राहू शकते . मात्र मनसे हे सहन करणार नाही असा इशारा यावेळी हेमंत सावंत यांनी दिला. मराठी भाषेत नामफलक न लावून राजभाषा मराठीचा अपमान करणाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हे दाखल करा . त्यांचे व्यवसायाचे परवाने रद्द करून त्यांना जबर दंड लावावा अशी मागणी सचिन पोपळे यांनी केली .