मीरारोड - होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात होणारी बेकायदा वृक्षतोड थांबविण्यासाठी पालिकेने पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. वृक्षतोड केल्याचे आढळुन आल्यास तोड करणारे व जमीन मालक यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तशी मागणी वाढत असुन दुसरीकडे पर्यावरणाचं महत्व पाहता वृक्षांचा बळी घेऊ नका, त्यांचे संरक्षण करा अशी जनजागृती करत शाळकरी विद्यार्थ्यांनी आज गुरुवारी पालिका उपायुक्तांना निवेदन दिले.
येत्या १ मार्च रोजी होळी हा सण येत आहे. होळी सणा निमीत्त मीरा भार्इंदर मध्ये मोठ्या प्रमाणात लहान - मोठ्या झाडांची बेकायदा तोड केली जाते. यात जांभूळ, आंबा, भेंडी, सुपारी सह खारफुटीची देखील सर्रास कत्तल केली जाते व त्याच्या होळ्या उभारल्या जातात. शिवाय सदर होळ्या जाळण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात लाकडं वापरली जातात. यातुन लहान मोठ्या निष्पाप वृक्षांचा बळी जाऊन पर्यावरणाचा रहास केला जातो. शिवाय त्यावर अवलंबुन असणारया पक्षी, प्राण्यांचे निवारे देखील उध्वस्त होतात.
तर काही जागरुक लोकां कडुन झाडं वा त्यांच्या मोठा फांद्या कापुन होळीसाठी जाळण्याऐवजी गवत, सुकी लाकडं, शेण्या आदिंचा वापर करुन होळी साजरी केली जाते. पण झाडं वा त्याच्या फांद्या कापुन होळी करणारयांचे प्रमाण देखील मोठं आहे. त्यासाठी सबंधित आयोजक वा प्रमुख लोकां कडुन जनजागृती करणं देखील टाळलं जातं.
तर होळी निमीत्त झाडांची कत्तल रोखण्यासाठी भार्इंदरच्या संत विन्सेंट दि पॉल शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती चालवली आहे. शाळेचे संचालिका ममता मोराईस व निकसन मोराईस यांनी देखील विद्यार्थ्यां सोबत पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उद्यान अधिक्षक नागेश इरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं.
निष्पाप झाडांचा बळी देण्या ऐवजी होळीच्या पवित्र अग्नीत नकारात्मकता, अहंकार व वाईट चालीरीती जाळुन नष्ट करुया. झाडं वाचवणं म्हणजे आॅक्सीजन वाढवुन आपलं आरोग्य वाचवणं अशा आशयाची जनजागृतीपर संदेश या वेळी विद्यार्थ्यां कडुन देण्यात आले. होळी साठी शेण्या व सुकं गवत वापरा असं आवाहनही विद्यार्थ्यांनी केलं. वृक्ष तोड रोखण्याची मागणी होत आहे.
महापालिकेने देखील होळी निमीत्त केली जाणारी बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. पालिकेने नागरीकांना होळी साठी झाडं वा झाडांच्या फांद्या कापु नका असं आवाहन केलं आहे. तर याला विरोध होऊन आता झाडांची कत्तल करण्यासाठी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.
बेकायदा वृक्षतोड नागरीकांनी होऊ देऊ नये. वृक्षतोड रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना पत्र देणार आहोत. शिवाय पालिकचे वृक्ष विभागाचे अधिकारी - कर्मचारी तसेच अन्य विभागातील अधिकारी - कर्मचारयांना देखील वृक्षतोड रोखण्यासाठी सतर्क केले आहे. मुख्य नाक्यांवर तपासणी करणार आहोत. झाडं तोडणारयांसह ज्या जागेतील झाडं तोडली जातील त्या जमीन मालकांवर देखील गुन्हे दाखल करणार.डॉ. संभाजी पानपट्टे (उपायुक्त)