मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने मे महिन्यात तोडलेला लॉज पुन्हा उभा राहिला आणि त्यातून पुन्हा वेश्या व्यवसाय चालवला जाऊ लागला आहे . पोलिसांनी केलेल्या कारवाईत २ पीडित तरुणींची सुटका करून ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मीरा भाईंदर मधील अनेक लॉज - हॉटेलातून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे प्रकार होऊन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत . सदर अनैतिक प्रकार चालणारे लॉज व ऑर्केस्ट्रा बारची अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याची मागणी पोलीस पालिके कडे पत्र देऊन करत असतात . त्या अनुषंगाने काशीमीरा महामार्गावरील महाविष्णू मंदिर जवळ स्टे इन लॉजींग हा अनधिकृत असल्याने पालिकेने २० मे रोजी तो पोकलेन लावून जमीनदोस्त केला होता.
दरम्यान पालिकेने तोडलेला लॉज पुन्हा बांधून सुरु करण्यात आला होता व बाहेरून पत्रे लावले होते . सदर लॉज मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाल्या नंतर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहायक निरीक्षक मंगेश बुराडे सह उमेश पाटील, रामचंद्र पाटील, केशव शिंदे, सम्राट गावडे, अपर्णा गायकवाड, विनोद राऊत, नम्रता यादव यांच्या पथकाने सापळा रचला.
बनावट गिऱ्हाईक पाठवून लॉजचे वेटर पैश्यांच्या मोबदल्यात वेश्या व्यवसाय साठी तरुणी आणून देताच पोलिसांनी छापा टाकला . २ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली . व्यवस्थापक श्रीनिवास शेट्टी (५१) , वेटर बिलबर प्रसाद गुप्ता (२८) व इंद्रदेव यादव (४१) ह्या तिघाना पकडण्यात आले . त्यांच्यासह लॉजचे चालक - मालक यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा नुसार काशीमीरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस चालक - मालकचा शोध घेत आहेत .