मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये २०१६ साली गाजलेल्या युएलसी घोटाळ्यात ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पालिकेचे निवृत्त नगररचनाकार सत्यवान धनेगावे , वास्तुविशारद शेखर लिमये आणि यूएलसी कार्यालयातील कर्मचारी भरत कांबळे ह्या तिघांना अटक केली आहे . तर पालिकेचे प्रभारी सहाय्यक संचालक नगररचना दिलीप घेवारे यांचा पोलीस शोध घेत आहेत . तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरुद्धच्या तक्रारी नंतर ह्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरु झाला आहे .
भाईंदर मधील काही विकासकांनी रहिवास क्षेत्र असताना देखील हरित क्षेत्र सांगून युएलसीतून सवलत मिळवणारी खोटी , बनावट प्रमाणपत्रे मिळवून महापालिकेच्या परवानग्या घेऊन इमारती बांधल्या आणि शासनाची फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याच्या एका तक्रारी प्रकरणी २०१६ साली ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह असताना ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता .
सर्वे क्रमांक ६६४ , ६६३ , ५६९ / १, ४ , ६६१ / १, २ , ३ आणि ६६२ / २ ह्या जमिनी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला . विकास आराखड्या नुसार सदर जमिनी रहिवासी क्षेत्रात असताना त्या हरित क्षेत्रात असल्याचे दाखवून २००० सालची युएलसी मधून सवलत मिळाल्याची बनावट प्रमाणपत्रे २००३ - २००४ सालात बनवण्यात आली .
ठाण्याच्या युएलसी विभागात खाजगी कँडिडेट म्हणून काम करणाऱ्या विश्वरूप उर्फ बबन पारकर ह्याने २००३ - २००४ साली अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हरित क्षेत्राची प्रमाणपत्रे टायपिंग करून घेतली . व त्यावर २००० साल टाकण्यात आले .
काही प्रमाणपत्रांचे तर मूळ अर्जच कार्यालयात नव्हते . तर काहींचे खोटे अर्ज केले होते . कार्यालयातील रजिस्टर मध्ये सुद्धा काही प्रमाणपत्राची नोंद नव्हती तर काहींची नोंद नंतर घुसवण्यात आली . गुन्ह्यात तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त भारत शेळके व पथकाने विकासक मनोज पुरोहित , रतिलाल जैन , शैलेश शेवंतीलाल शाह , श्यामसुंदर अग्रवाल सह विश्वरूप उर्फ बबन पारकर याना अटक केली होती . या प्रकरणात तत्कालीन अपर जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे यांना आरोपी केले होते .
परंतु तपासात आणखी सुद्धा युएलसी प्रमाणपत्रे सापडली होती . तसे असताना अन्य अनेक विकासकांसह युएलसी आणि महापालिका कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना मात्र आरोपी न करता त्यांच्या कडून मोठी रक्कम वसुली करून तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पाठीशी घातल्याची तक्रार विकासक राजू शाह यांनी पोलीस महासंचालक यांच्या कडे केली होती .
विकासकांनी महापालिका नगररचना मधील अधिकारी आणि युएलसी कार्यालयातील अधिकारी यांच्या संगनमताने शासनाची फसवणूक करून महसूल बुडवत तसेच कोट्यातील सदनिका शासनाला मिळू नये म्हणून खोटी प्रमाणपत्रे आणि बांधकाम परवानग्या मिळवून इमारती बांधल्या . ह्यात विकासकांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा फायदा करून घेतला असे तक्रारीत म्हटले होते .
त्या अनुषंगाने ह्या गुन्ह्याची पुन्हा सखोल चौकशी ठाणे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील व पथकाने सुरु केली आहे . गुरुवारी उशिरा या प्रकरणात महापालिकेचे निवृत्त नगररचनाकार सत्यवान धनेगावे , वस्तू विशारद शेखर लिमये सह तत्कालीन युएलसी विभागातील कर्मचारी भरत कांबळे ह्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे .
तर घोटाळ्या वेळी ठाणे जिल्हा नगरचना कार्यलयात कार्यरत असलेले आणि सध्या मीरा भाईंदर महापालिकेचे प्रभारी नगररचना सहाय्यक संचालक असलेले दिलीप घेवारे यांचा ठाणे पोलीस शोध घेत आहेत . घेवारे हे गेल्या सुमारे १४ दिवसां पासून नॉटरिचेबल आहेत . तर पालिकेत त्यांनी ८ ते ११ जून अशी रजा घेतली असली तरी ते त्या आधी पासूनच कार्यालयात आलेले नाहीत . पोलिसांनी विमानतळावर सुद्धा अलर्ट दिले आहे . ठाणे पोलिसांनी अटक केलेले भरत कांबळे हे सध्या पालघर जिल्हा कार्यालयात कार्यरत आहेत . ते पूर्वी घेवारे यांचे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते.