लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर मध्ये रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे नाकारून मनमानी भाडे वसूल करत असल्याचे वृत्त लोकमत ने दिल्या नंतर वाहतूक पोलीस आणि आरटीओ ने तीन दिवसात तब्बल २४५ रिक्षांवर कारवाई केली . रिक्षा चालकाने मीटर प्रमाणे भाडे नाकारले वा जास्त भाडे मागितले तर थेट वाहतूक पोलिस किंवा स्थानिक पोलिसां कडे तक्रार करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे .
भाईंदर मध्ये मीटर प्रमाणे भाडे आकारणे कायद्याने बंधनकारक आहे . तरी देखील रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे नेण्यास नकार देतात . तसेच मनमर्जी नुसार अवास्तव भाडे सांगतात . प्रवाशांची अडवणूक करून त्यांची लूट करणाऱ्या रिक्षा चालकां विरुद्ध संताप व्यक्त होत होता . शेअर भाडे मंजूर असले तरी त्यात देखील जास्त भाडे घेतात .
या बाबतचे वृत्त लोकमत ने दिल्या नंतर मीरा भाईंदर - वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते ह्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली . दाते ह्यांनी आदेश दिल्या नंतर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शेखर डोंबे सह वाहतूक पोलीस आणि आरटीओ ह्यांनी शहरात ६ ते ८ ऑक्टॉबर असे तीन दिवस कारवाईची विशेष मोहीम राबवली .
ह्या तीन दिवसात पोलिसांनी भाईंदर पूर्व व पश्चिम , काशिमीरा नाका , सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट ) आदी ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली . मीटर प्रमाणे रिक्षा भाडे नाकारणे , जास्त भाडे घेणे , विना परवाना रिक्षा - टॅक्सी चालवणे , अवैद्य प्रवासी वाहतूक , बेशिस्त वाहन चालक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रकरणी तीन दिवसात एकूण १३०४ केस करण्यात आल्या . त्या मध्ये २४५ रिक्षांवर कारवाई केली गेली .
६ रोजी भाईंदर पूर्व व पश्चिम भागात ८५ रिक्षा व इतर वाहने मिळून ४४५ केस केल्या . ७ रोजी काशिमीरा नाका येथे ६१ रिक्षांवर कारवाई करून ४२५ केस केल्या . तर ८ ऑक्टॉबर रोजी भाईंदर पूर्व - पश्चिम, सावरकर चौक (गोल्डन नेस्ट) व काशिमीरा नाका येथे ९९ रिक्षां सह ४३४ केस करण्यात आल्या
पोलीस आणि आरटीओ ची कारवाई शहरात सुरूच राहणार असून रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे नाकारू नये आणि जास्त भाडे घेऊ नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा डोंबे ह्यांनी दिला आहे . नागरिकांनी देखील मीटर प्रमाणे भाडे नाकारणाऱ्या, जास्त भाडे मागणाऱ्या रिक्षा - टॅक्सी चालकांची तक्रार स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसां कडे करावी असे आवाहन डोंबे ह्यांनी केले आहे . पोलीस कारवाईचे नागरिकां कडून स्वागत होत असून कारवाईत सातत्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे .