मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला; शरद पवारांचे स्पष्ट संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:46 AM2019-04-24T01:46:55+5:302019-04-24T01:47:11+5:30
मेंडोन्सा, गीता जैन यांच्या राजकीय मनसुब्यांवर फिरले पाणी
मीरा रोड : मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने चांगला कार्यकर्ता उमेदवार म्हणून द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पाठिंबा देईल, असे मत मीरा रोड येथील सोमवारच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. यापूर्वी माजी मंत्री गणेश नाईक यांनी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचे नाव उमेदवारीकरिता पत्रकार परिषदेत घेतले होते. पवार यांनी त्यावर शिक्कामोर्तबच केले.
राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा काँग्रेससाठी सोडतानाच येणारी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची सुरुवात मीरा-भार्इंदरमधून केल्याचे पवार म्हणाले. जागा सोडण्याची अशी जाहीर घोषणा पवारांनी केल्याने व्यासपीठावर बसलेले काँग्रे्रस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेही आश्चर्यचकित झाले. पवारांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याकरिता प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे संपुष्टात आले आहेत.
मीरा-भार्इंदर हा मतदारसंघ २००९ साली अस्तित्वात आला, तेव्हा मुझफ्फर हुसेन यांनी दावा केला असता आघाडीत तो राष्ट्रवादीने खेचून घेतला होता. गिल्बर्ट मेंडोन्सा हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मध्ये आघाडी नसल्याने आणि मोदीलाटेत मेंडोन्सांना पराभूत करून भाजपचे नरेंद्र मेहता आमदार झाले. मेंडोन्सा सेनेत गेले, पण युती झाल्याने मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार म्हणून मेंडोन्सा लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा राष्ट्रवादीत जातील आणि निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली होती. आ. मेहतांच्या विरोधक माजी महापौर गीता जैन यासुद्धा राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती.
मेंडोन्साविरोधी गटसुद्धा उल्हसित
काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. हुसेन यांनी स्थानिक नेत्यांपासून थेट पवारांपर्यंत तसेच आपल्या पक्ष नेतृत्वाकडे काँग्रेसला मतदारसंघ सुटावा म्हणून प्रयत्न चालवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गेल्या महिन्यात आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसला विधानसभा मतदारसंघ सोडण्याचे संकेत दिले होते. पवार यांनी तर तशी घोषणाच सभेत केली. मीरा-भार्इंदरमधील परांजपे यांच्या प्रचाराची धुरा हुसेन यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने दिली. पवारांच्या घोषणेमुळे मीरा-भार्इंदर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीतील मेंडोन्साविरोधी गटसुद्धा उल्हसित झाला आहे.