मीरारोड - मीरा भाईंदर मधील भाजपाचे वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पक्ष आणि पालिका कारभारातील हस्तक्षेपा विरोधात भाजपाचे जिल्हाध्यक्ष, महापौरांसह महत्वाचे पदाधिकारी आणि काही नगरसेवक यांची रविवारी सायंकाळी भाईंदर येथे बैठक झाली. मेहतांच्या हस्तक्षेपा विरोधात भूमिका मांडत या पुढे जिल्हाध्यक्षानी सर्व सूत्रे हाती घेऊन निर्णय घ्यावेत असा सूर या बैठकीत निघाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मीरा भाईंदर भाजपाची सर्व सूत्रे मेहता हेच हाती धरून आहेत. परंतु मेहतांची एकाधिकारशाही कार्य पद्धती, सतत वादात राहणे आणि घराणेशाही चालवण्यासह मर्जीतील लोकांना पुढे करणे आदी कारणांनी त्यांच्या विरोधात पक्षात तसेच बाहेर देखील नाराजी खदखदत होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा मेहतांवर वरदहस्त असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी पुढे येत नसे.
परंतु विधानसभा निवडणुकीत लोकांनी मेहतांना पराभवाची धूळ चारली. गीता जैन अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यावर त्या भाजपा सोबतच होत्या. पण महापालिकेतील सूत्रे गीता यांच्या हाती देण्यास टोलवाटोलवी झाल्याने त्या भाजपापासून दूर झाल्या. गीता बाजूला गेल्याने शहर भाजपाची सूत्रे मेहतांच्या हाती कायम राहतील असा अंदाज होता.
महापौर पदाच्या उमेदवारी वेळी बहुतांश नगरसेवकांनी मेहता समर्थक उमेदवारास विरोध करून ज्योत्सना हसनाळे यांना पाठिंबा दिला आणि त्या महापौर झाल्या. त्यानंतर पुन्हा जिल्हाध्यक्ष झालेले हेमंत म्हात्रे यांच्या सह अनेक नगरसेवकांनी मेहतांच्या विरोधात उघड भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यातच मेहतांच्या सी एन रॉक हॉटेल मध्ये नगरसेवकांची शनिवारी ठेवलेली आढावा बैठक जिल्हाध्यक्षांनी रद्द करायला लावली आणि शुक्रवारी मेहतांनी नगरसेविका वैशाली रकवी यांच्या स्थायी समिती सदस्य पदाचा घेतलेला राजीनामा देखील रकवी यांना साथ देऊन मागे घ्यायला लावला.
रविवारी सायंकाळी भाईंदर येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रें सह महापौर ज्योत्सना हसनाळे, स्थायी समिती सभापती अशोक तिवारी, माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, माजी सभापती मदन सिंह, विनोद म्हात्रे, मुन्ना सिंह, रवी व्यास, सुरेश खंडेलवाल सह अन्य काही नगरसेवक व त्यांचे नातलग उपस्थित होते. कमी वेळात तातडीची बैठक बोलावण्यात आली असल्याने बाकीच्या नगरसेवकांना सुद्धा पुन्हा एक बैठक घेऊन बोलावण्यात येणार असल्याचे सूत्र म्हणाले.
या बैठकीत महापालिकेतील कामकाज व पक्षाचे कामकाज हे जिल्हाध्यक्ष यांच्या मंजुरी नुसार या पुढे केले जावे. महापौरांनी आणि स्थायी समिती सभापती यांनी देखील विषय घेताना तसेच ठराव आदी कामकाज हे मेहतांच्या सांगण्या नुसार करू नये यावर चर्चा झाल. शहर आणि पक्ष हित महत्वाचे आहे. केवळ व्यक्ती आणि त्याच्या कंपनीच्या तुंबड्या भरण्यासाठी लूट खपवून घेणार नाही निर्धार व्यक्त केला गेल्याचे सूत्रांनी सांगितले.