मीरारोड - मीरा भाइंदर मनसेच्या वतीने जुन्या पेट्रोल पंपा जवळील सभागृहात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात अर्ज केलेल्या १७०० पैकी ११६७ तरुणी - तरुणांना त्याच ठिकाणी नोकरी उपलब्ध करुन देण्यात आली.मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित सदर मेळाव्याचे आयोजन मनसेचे शहर संघटक हेमंत सावंत, दिनेश कनावजे, शशी मेंडन यांनी केले होते. जाधव यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने तरुणी व तरुणांनी नोकरी मिळण्यासाठी गर्दी केली होती. शिबीरात १७०० तरुणी - तरुणांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली होती. त्या पैकी ११६७ जणांना शिबीरातच नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.शिबीर यशस्वी करण्यासाठी उपशहर संघटक समाकांत माळी , चंद्रशेखर गजरे , विशाल चव्हाण, सचीव मनीष कामतेकर , महिला आघाडीच्या पदाधिकारी सुषमा बाटे, वैशाली येरुणकर , रेश्मा तपासे, कुमकुम पाठक , कविता वायंगणकर तर विद्यार्थी सेनेचे शान पवार आदींनी मेहनत घेतली. बँकींग, आयटी पासुन सुरक्षा एजन्सी आदी विविध क्षेत्रात इच्छुकांच्या शैक्षणिक अर्हते नुसार नोकरी देण्यात आल्याचे हेमंत सावंत म्हणाले.
मीरा भाईंदर मनसे रोजगार मेळाव्यात ११६७ जणांना मिळाली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 8:11 PM