मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकाचा कोरोना मुळे आज बुधवारी मृत्यू झाला असून उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे . कोरोनाने पालिकेत शिरकाव केल्याने आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी आज दिवसभरासाठी स्वतःला अलगीकरण केले .
महापालिका मुख्यालयात काम करणारे आरोग्य विभागाचे लिपिक रामकृष्ण गावडे यांचे आज बुधवारी कोरोना मुळे निधन झाले . त्यांना गेल्या आठ दिवसां पासून भक्तिवेदांतच्या पी व्ही जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते .
उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांचा कोरोना चाचणी अहवाल काल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला अलगीकरण करून घेतले आहे . मंगळवारी सकाळी पानपट्टे कार्यालयात आले होते . त्यांचा वाढदिवस होता . पण दुपारी अहवाल आल्याने ते निघून गेले .
पानपट्टे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर आयुक्त डॉ . राठोड यांनी स्वतःला अलगीकरण करून घेतले आहे . त्यांची चाचणी करण्यात येऊन अहवाल निगेटिव्ह आल्यास ते पुन्हा कामावर रुजू होतील असे सूत्रांनी सांगितले. परंतु जनसंपर्क अधिकारी राज घरत यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले . आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही .
या आधी अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे देखील कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल आहेत . शिवाय पालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांना सुद्धा लागण झाली.