लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - अनैतिक प्रकार व वेश्या व्यवसाय चालत असलेल्या ऑर्केस्ट्रा बार आणि लॉज वर तोडक कारवाई साठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेने अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार व लॉज वर तोडक कारवाई सुरु केली आहे . पालिकेने आणखी ३ ऑर्केस्ट्रा बार व १ लॉजच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे . परंतु नगरसेवक व राजकारणी यांच्याशी संबंधित बार - लॉज वर मात्र ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप होऊ लागला आहे .
मीरा भाईंदर मधील अनेक ऑर्केस्ट्रा बार व लॉज मधून अनैतिक आणि वेश्या व्यवसाय चालत असल्याचे प्रकार पोलिसांनी केलेल्या अनेक गुन्ह्यां वरून स्पष्ट झाले आहे . पोलिसां कडून महापालिकेस सातत्याने अनतिक व्यवसाय चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार व लॉज ची यादी देऊन अनधिकृत बांधकामा वर कारवाई करण्याची पत्र सातत्याने दिली जातात . परंतु महापालिका प्रशासना सह काही नगरसेवक - राजकारणी मात्र ह्या अनैतिक व्यवसाय चालणाऱ्या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असतात . कारण स्वतःहून ठोस कारवाई पालिका करत नाही आणि लागेबांधे असलेले नगरसेवक - राजकारणी देखील गप्प असतात . न्यायालयात सुद्धा विधी विभाग प्रभावी बाजू मांडत नाही .
सतत तक्रारी करून देखील अनैतिक व्यवसाय चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार व लॉज वर कारवाई होत नसल्याने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सह गीता जैन यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता . त्या नंतर कुठे पालिकेने अनधिकृत बांधकाम असलेल्या ऑर्केस्ट्रा बार व लॉज वर कारवाई सुरु केली .
पालिकेने काशीमीरा हद्दीतील महामार्गावर असलेल्या बॉसी , नाईट सिटी व नाईट मिटिंग ह्या ३ ऑर्केस्ट्रा बार वर मंगळवारी तोडक कारवाई केली . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . परंतु बॉसी बार एका नगरसेवकाशी संबंधित असल्याने नाममात्र कारवाई करण्यात आली . तसेच काही नगरसेवक व पदाधिकारी यांचे अनधिकृत लॉज व ऑर्केस्ट्रा बार ना पालिकेने अजून हात लावला नसल्याचा आरोप होऊ लागला आहे . तर पालिकेचे अधिकारी मात्र कारवाई सुरूच राहणार असून कोणाची गय केली जाणार नसल्याचे दावे करत आहेत.
सोमवारी पालिकेने चेणे येथील हेरिटेज लॉज च्या तळ मजल्यावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत खोल्या तोडल्या . गेल्या शुक्रवारी महाजनवाडी भागात असलेल्या रॉकस्टार व मॅडनेस ऑर्केस्ट्रा बार तसेच स्टे इन लॉज हि तळ अधिक एक मजली अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली होती .