मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांंतर्गत ठोक मानधनावर औषध निर्माण अधिकारी नेमताना शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलून पदे भरल्याचे उघड झाले आहे. या पदावर पात्र ठरवलेला उमेदवार पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा नातलग असल्याने या निवडप्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आयुक्तांच्या ५ जून २०१४ रोजीच्या आदेशानुसार कंत्राटी पदे भरताना अनुभवाबाबत फक्त शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्राप्त अनुभव ग्राह्य धरला जावा. तसेच औषध निर्माण अधिकारी या पदांसाठी मुलाखत १०० गुणांची असेल व कोणत्या गोष्टीसाठी किती गुण असावेत, याचा तक्ताच जाहीर केला आहे. ९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या आरोग्य सेवा संचालकांच्या पत्रात शासकीय सेवेत काम केलेल्यांना प्राधान्य दिले जावे, असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. परंतु, पालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत औषध निर्माण अधिकारी हे पद ठोक मानधनावर भरण्यासाठी जाहिरात दिली. त्यात मुलाखत किती गुणांची असेल? कोणत्या विषयासाठी किती गुण असतील आदी माहिती दिली गेली नाही. निवडीच्या अर्हतेमध्ये शासकीय सेवेतील कामाच्या अनुभवास प्राधान्य, असे सोयीस्करपणे टाळत केवळ कामाचा अनुभव अशी अट ठेवली. १८ फेब्रुवारीला मुलाखतीला प्रत्यक्षात ५० गुणांचीच परीक्षा घेतली गेली.या मुलाखतीत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी सोनाली दत्तात्रेय वराडे यांची निवड करण्यात आली. ५० गुणांपैकी २८.४७ गुण त्यांना मिळाले. वराडे यांना शासकीय सेवेतील कामाचा अनुभव नसताना त्यासाठी पाचपैकी पाच गुण दिले गेले. मुलाखतीवेळी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यासह अन्य सदस्यांमध्ये पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बालनाथ चकोर हे उपस्थित होते. सदस्य निवड समितीचे आरोग्य सेवेचे उपसंचालक मात्र नव्हते.औषध निर्माण अधिकारीपदावर निवड केली गेलेल्या वराडे या डॉ. बालनाथ चकोर यांच्या नातलग आहेत. वराडे या डॉ. चकोर यांच्या नातलग असतानाही ते मुलाखत घ्यायला थांबले व गुण दिले. ज्या विभागातील हे पद भरले गेले, त्या विभागाचे डॉ. चकोर हेच प्रमुख आहेत. त्यामुळे शासनाचे निर्देश धाब्यावर बसवून मुलाखत व निवड संगनमताने केल्याचा आरोप श्रमजीवी कामगार संघटनेने कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी केला आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी हे आरोप फेटाळले आहेत.सोनाली वराडे या माझ्या नातलग असल्या तरी त्यांची औषध निर्माण अधिकारी या पदावरील निवड समितीने केलेली आहे. यात कोणताही गैरप्रकार नसून गुणवत्तेच्या आधारे ही नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही खासगी क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर नियुक्त्या झालेल्या आहेत. गुणवत्तेवर निवड होऊनही केवळ नातलग असल्याने काही व्यक्ती नाहक विषयाला वेगळे वळणदेत आहेत.-डॉ. बालनाथ चकोर, क्षयरोग अधिकारी, मीरा-भार्इंदर मनपा
शासनाचे निर्देश डावलून महापालिका भरतीत नातलगाच्या वर्णीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 1:23 AM