मीरारोड - नगरपालिका काळात रोजंदारीवर लागलेल्या आणि २००० साली शासनो विशेष बाब म्हणुन कायम केलेल्या मीरा भार्इंदर महापालिकेतील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्क मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही मीरा भार्इंदर कामगारसेनेच्या माध्यमातुन सुरुच आहे. आता सदर कर्मचारायांना वारसा हक्क मिळवुन देण्यास शासनास भाग पाडु असे आश्वासन महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिले आहे. मंगळवारी नगरभवन येथे कामगार सेनेने आयोजित कर्मचारायांच्या मेळाव्यात बोलत होते.भार्इंदर पश्चिमेच्या नगरभवन येथे झालेल्या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने, सहसचिव वरेश कमाने, कोषाध्यक्ष मार्तंड द्राक्षे, आरोग्य विभाग संघटनेचे सचिव बाबाराम कदम, राज्य राखीव पोलीस बल संघटनेचे सरचिटणीस सुभाष गोरे सह मिरा भार्इंदर कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष गोविंद परब, सचिव कैलास शेवंते, मुत्तुपांडे पेरूमल, सुनील पाटील, देवानंद पाटील, उल्हास आंग्रे, सुलेमान मुलाणी, वसंत पेंढारे, विजय म्हात्रे, सुजित घोणे, किरण पाटील आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी गोविंद परब यांनी ५३८ कर्मचार्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही सर्वजण मध्यवर्ती संघटनेच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही पठाण व सहकारायांना दिली. नगरपालिका काळात रोजंदारीवर ९१ - ९३ दरम्यान या ५३८ सफाई कर्मचारायांची भरती करण्यात आली होती. लाड व पांगे समितीच्या शिफारशी नुसार २००० साली शासनाने राज्य स्तरावर घेतलेल्या निर्णयात सदर सफाई कर्मचारी देखील पालिका सेवेत कायम झाले होते.परंतु सदर कर्मचारायांना पालिका सेवेत कायम स्वरुपी विशेष बाब म्हणुन सामावुन घेण्यात आल्याने निवृत्ती व निधना नंतर वारसा हक्क लागु राहणार नाही असे शासनाने स्पष्ट केले होते. तेव्हा पासुन या कर्मचारायांना वारसा हक्काचा लाभ मिळालेला नाही. ५३८ कर्मचारी पैकी ५० ते ६० कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत तर ५० कर्मचारी मयत झाले आहेत. अशा कर्मचार्यांच्या वारसांना शासनाची मंजुरी मिळत नसल्याने पालिका सेवेते वारसा हक्काने घेता येत नाही. जेणे करुन काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.सफाई कामगारांना लाड - पांगे समितीच्या शिफारस लागू असताना येथील कामगारांना वारसा हक्का सह सेवा ज्येष्ठतेचा लाभ का मिळत नाही असा सवाल करत सर्व कर्मचार्यांना एकच कायदा असताना येथील कर्मचार्यांना वेगळा न्याय का ? असे पठाण म्हणाले. कर्मचार्यांच्या आयुष्याची १० ते १२ वर्षे वाया जाऊ नये म्हणून त्यांना सेवा ज्येष्ठते मध्ये त्याचा लाभ मिळून देऊ. महानगरपालिका आस्थापने वरील सदर ५३८ सफाई कर्मचार्यांना वारसा हक्क लागू करणे तसेच अनुकंपा तत्वाचा न्याय मिळवुन देण्यास चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शासनास भाग पाडेल. वेळ पडल्यास आंदोलन करू. मंत्रालय बंद पाडू असा इशारा पठाण यांनी दिला.
मीरा भाईंदर महालिकेच्या ५३८ कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळून देण्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 3:30 PM