भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत कार्यरत असलेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांसह दोन वयोमानानुसार थेट पात्र ठरलेल्या ९ कनिष्ठ अभियंत्यांच्या वाहन भत्यात यंदा तब्बल १०० टक्के वाढ होणार असून तसा प्रस्तावच आजच्या स्थायी समिती बैठकीत मान्यतेसाठी आणण्यात आला आहे. हा वाहन भत्ता वाढीचा लाभ केवळ व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांनाच मिळणार आहे. परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांना मात्र यापासून वंचित राहावे लागणार आहे.पालिकेत सुमारे १६ कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. यातील बहुतांशी अभियंत्यांनी गेल्या वर्षी व्यावसायिक परिक्षा दिली होती. त्यात काही उत्तीर्ण झाले, तर काही अनुत्तीर्ण झाले. दोन कनिष्ठ अभियंत्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांना परिक्षेतून सूट देण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांच्या वाहन भत्यात यंदा १० हजार रुपयांहून २० हजार रुपये अशी १०० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. यासाठी त्या कनिष्ठ अभियंत्यांनी प्रशासनाकडे मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांनी सेवेत १२ वर्षे पूर्ण केल्याचा कांगावासुद्धा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या उत्तीर्ण कनिष्ठ अभियंत्यांखेरीज काही कनिष्ठ अभियंतेदेखील उत्तीर्ण झाले असले तरी त्यांनी सेवेत १२ वर्षे पूर्ण केली नसल्याचा दावा करण्यात येत असल्याने त्यांना वाहन भत्ता वाढीतून वगळण्यात आले आहे. अशा प्रकारे अनुत्तीर्ण झालेल्या ७ कनिष्ठ अभियंत्यांना मात्र या वाढीतून हेतूपुरस्सर वगळण्यात आले आहे. हे अभियंतेसुद्धा उत्तीर्ण झालेल्यांसारखेच समान काम करत आहेत. तसेच त्यांतील काहींची सेवा सुद्धा १२ वर्षांपेक्षा जास्त झाली असताना त्यांना या वाहन भत्याच्या वाढीतून वगळणे कितपत योग्य ठरते, अशी चर्चा त्या त्या कनिष्ठ अभियंत्यांत सुरू झाली आहे.
उत्तीर्ण कनिष्ठ अभियंत्यांना उप अभियंता पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. मात्र त्यांना त्या पदावर पदोन्नती दिलेली नाही. काही वरीष्ठ अधिकारी आपल्या मर्जीतील कनिष्ठ अधिकाऱ्यांवर मेहेरबान असल्यानेच मर्जीत नसलेल्यांना डावलले जात असल्याचा आरोपदेखील केला जात आहे. पेट्रोल, डिझेल, वाहन चालकाचा पगार व वाहन दुरुस्तीच्या नावाखाली दिली जाणारी १०० टक्के वाहन भत्ता वाढ उर्वरीत कनिष्ठ अभियंत्यांच्या गुणवत्तेवर आधारित कशी काय ठरू शकते, असा प्रश्नदेखील उपस्थित होऊ लागला आहे. यावर सत्ताधारी योग्य भूमिका घेऊन वंचितांना लाभ मिळवून देतील, असा विश्वास वाहन भत्ता वाढीतून वगळलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.