मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेने यंदा गणेश विसर्जनासाठी ४ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तलावांचे जलप्रदूषण कमी करण्यासह पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, म्हणून कृत्रिम तलाव केल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. नागरिकांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
कोविड-१९ मुळे या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याबाबतचे परिपत्रक महानगरपालिका कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात गणेशोत्सव साजरा करणेबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार प्रभाग समिती क्रमांक १ ते ६ या हद्दीत मूर्ती स्वीकृती केंद्र तयार करण्याचे, तसेच कृत्रिम तलावाची निर्मिती करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
शहरातील तलावात तसेच खाडी व समुद्रात दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. यामध्ये मुख्यतः पीओपी मूर्तींचा समावेश असतो. पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्याने तलावातील पाणी दूषित होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात ४ ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मीरा रोडच्या शिवार उद्यानालगत, भाईंदर पूर्वेच्या सुभाषचंद्र बोस मैदानात, भाईंदर पश्चिमेच्या नवघर शंकर नारायण महाविद्यालयासमोर, तर मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्सजवळील जॉगर्स पार्क येथे ही कृत्रिम तलावे निर्माण करण्यात आली आहेत. या तलावांच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
नागरिकांनी जवळच्या परिसरातील कुंडात किंवा कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या स्वीकृती केंद्रावर नागरिकांनी नाहक गर्दी करू नये. कोविडच्या नियमांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साधा व पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.