मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऑक्सिजन वाहतूक करणारा टँकर भाडेतत्त्वावर घेतला आहे. पालिकेने मीनाताई ठाकरे सभागृहात १६५ ऑक्सिजन खाटांची व्यवस्था केली असून, खासगी कोविड रुग्णालयांची संख्या १८ ने वाढविल्याचे आयुक्त दिलीप ढोले यांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेने टँकर भाड्याने घेतल्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत आला आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत स्व. मीनाताई ठाकरे सभागृहात १६५ ऑक्सिजन खाटांची व्यवस्था असून, अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात आणखी १०० ऑक्सिजन खाटांची सेवा सुरू केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात पाच ते सहा खासगी कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचे ६० जम्बो सिलिंडर्स वेळेत उपलब्ध करून तेथील रुग्णांचे प्राण वाचविण्याची महत्त्वाची भूमिका पालिका प्रशासनाने बजावली आहे.
..................
२,३८४ खाटांची अतिरिक्त व्यवस्थासुद्धा तयार
महापालिकेने नयानगरच्या हैदरी चौक पालिका सभागृहात १५० खाटा, तर भाईंदरच्या माहेश्वरी भवन येथे १५० अशा २५० खाटांची सुविधा येत्या आठ दिवसांत कोरोना रुग्णांसाठी सुरू केली जाणार आहे. याशिवाय डेल्टा गार्डन येथे ८६२, न्यू गोल्डन नेस्ट आर-२ या इमारतीत ९५२ तसेच काशीमीरा येथे खासगी इमारतीत ३२० असे दोन हजार १३४ सर्वसाधारण खाटांची तयारी पालिकेने चालविली आहे .
...................
आणखी १८ खासगी रुग्णालयांत कोरोनावर उपचार
शहरात याआधी २५ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिलेली होती. आता आणखी १८ खासगी रुग्णालयांनासुद्धा कोरोना उपचाराची परवानगी दिली आहे. दोन रुग्णालयांना खाटांची संख्या वाढवून दिली आहे. यामुळे कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांत आणखी खाटांची उपलब्धता झाली असून, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.