मीरारोड - ४५ वर्षां वरील नागरिकांचे ३ मे पर्यंत ४३ टक्के इतके लसीकरण करून मीरा भाईंदर महापालिका जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर आहे . लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास शहरातील नागरिकांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याची तयारी महापालिकेची आहे. मीरा भाईंदर महापालिकेची लोकसंख्या १० लाख ४७ हजार ३४६ इतकी गृहीत धरण्यात आली आहे . लसीकरण केंद्रांसाठी पालिकेची १२ तर खाजगी ९ लसीकरण केंद्र सुरु केली आहेत . आणखी २७ नवीन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार असून तसा मंजुरीचा प्रस्ताव पाठवला आहे .
लसींचा तुटवडा असून पुरवठा सुरळीत होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे . तरी सुद्धा महापालिकेने ३ मे पर्यंत ४५ वर्षां वरील १ लाख ३५ हजार ४२३ नागरिकांचे पहिला डोस देऊन लसीकरण केले आहे . तर ३१ हजार ८८२ नागरिकांना लसीचा दुसरा डोस आला आहे . शहरातील ४५ वयोगटा वरील नागरिकांची एकूण संख्या ३ लाख १४ हजार २०४ इतकी आहे .
४५ वर्षां वरील ४३ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात मीरा भाईंदर महापालिका हि ठाणे जिल्ह्यातील अव्वल महापालिका आहे . नवी मुंबई महापालिकेत हेच प्रमाण ३८ टक्के ; ठाणे महापालिका २९ टक्के ; कल्याण डोंबिवली २२ टक्के ; उल्हासनगर १८ टक्के तर भिवंडी निजामपूर महापालिकेने केवळ ११ टक्के इतकेच लसीकरण केले आहे.
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असले तरी लसींचा पुरवठा नसल्याने भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातच लसीकरण सुरु आहे . ह्यात सुद्धा मीरा भाईंदर महापालिकेने ३ मे पर्यंत १२८६ नागरिकांचे लसीकरण केले आहे . ह्या वयोगटातील नागरिकांची संख्या ४ लाख ३९ हजार ८८५ इतकी आहे . लस मिळाल्यास अन्य केंद्र सुरु करता येणार आहेत .
वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील लसीकरणात सुद्धा महापालिकेने आघाडी घेतली आहे . १७ हजार २९७ कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर ८५४७ लोकांना दुसरा डोस दिला आहे . उद्दिष्टा पेक्षा जास्त लसीकरण केले आहे . महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ . संभाजी वाघमारे , लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ . अंजली पाटील आणि लसीकरण केंद्रातील विविध कर्मचारी आदींच्या प्रयत्नांना मिळत असलेले यश मानले जात आहे. लसीकरण केंद्र व त्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि व्यवस्थेचे नियोजन महापालिकेने केलेले आहे . शासना कडून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यास नागरिकांचे वेगाने लसीकरण पूर्ण करता येईल असा विश्वास महापालिका प्रशासनाला आहे .