मीरारोड - पावसाळा येण्या आधी दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा महापालिका पोलिसांसह संबंधित विविध विभागांची बैठकआपत्ती व्यवस्थापना बाबत बैठक होऊन त्यात दुर्घटना घडू नये, पाणी तुंबू नये आदींवर त्यात चर्चा केली. आवश्यक उपाययोजना करण्याच्या आयुक्तांनी संबंधितांना सूचना दिल्या.
मीरा भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन तथा मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त रवि पवार, कल्पिता पिंपळे व सचिन बांगर, मुख्यालय सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार मराठे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, उत्तन सागरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे , शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, शरद नानेगावकर, प्रभाग समिती अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी, महानगर गॅसचे प्रतिनिधी, मेट्रो ठेकेदार जे. कुमारचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
आयुक्त काटकर यांनी , पावसाळ्या दरम्यान कोणत्याही आपत्कालीन घटना यावर्षी घडू नये यासाठी आधीपासूनच आवश्यक ती दक्षता घ्या व प्रतिबंधात्मक उपाययोजना करा . गटार किंवा नाल्या शेजारील तसेच रस्त्यावरील डेब्रिज उचला . पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे साफ ठेवा . बंदिस्त नाले व नैसर्गिक नाले यांची सफाई वेळेत पूर्ण करा. नाले सफाईनंतर किनारी काढून ठेवलेला गाळ थोडासा सुकल्यानंतर लगेच उचला असे निर्देश दिले.
सध्या सुरू असलेल्या स्थापत्य विषयक कामांची स्थिती जाणून घेत ही कामे २४ X ७ तास सुरू ठेवून जलद गतीने व कामाची गुणवत्ता राखून पूर्ण करा. रस्ते खड्डेमुक्त राहावेत याकडे काटेकोर लक्ष द्या . कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर खड्डा चालणार नाही. मॅनहोल वर व गटारां वर झाकणे लावून सुस्थितीत ठेवा . रस्त्यावरील दिवाबत्ती सुव्यवस्थित राहील व विद्युत खांबामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घ्या. उघड्या केबल नसाव्यात . डीपीची झाकणे बंद करून घ्या . महानगर गॅस , एमटीएनएल , अदानी इलेक्ट्रिकसीटी आदी विवि कंपन्यांनी केलेल्या खोदकामांची माहिती घेऊन ती तातडीने पूर्ण करून रस्ते दुरुस्ती करून घेण्यास आयुक्तांनी सांगितले.
वाहतुक पोलीस विभागामार्फत प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने पावसाळी काळात सिग्नल यंत्रणा नियमित कार्यान्वित राहील याकडे लक्ष द्यावे तसेच स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसींगच्या रंगरंगोटीचीही कामे आपापल्या अखत्यारितील रस्त्यांवर करून घ्यावीत असे सूचित केले. बांधकामे सुरू असलेल्या इमारतींची माहिती व इमारतीच्या चहूबाजूंनी सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या व इतर अपघात प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे व तो कोणत्याही प्रकारे दूषीत होणार नाही याची काळजी घ्या. जल शुध्दीकरणकरीता आवश्यक त्या उपाययोजना करा . मल:निसारण जलवाहिन्या दुरुस्त करून घ्या . प्रभाग अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतींची पाहणी करून इमारतींचे वर्गीकरण करून त्यांची यादी जाहीर करावी . त्या बाबत दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी असे आयुक्तांनी संबंधितांना सांगितले . शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्त काटकर यांनी शहरातील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून नियोजन करावे व त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी असे सूचित केले.