भाईंदर - पुर्वेच्या प्रभाग ३ मधलि पालिका भूखंडावर खुली व्यायामशाळा व लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्याकरिता पालिकेने बांधलेली भिंत भाजपा नगरसेवक मदन सिंह यांनी पाडली. सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याच्या प्रमुख मागणीसह अनेक विकासकामे मंजुर होऊनही ती सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली रद्द केली जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण यांनी सोमवारी आयुक्त दालनाबाहेर आमरण उपोषण सुरु केले होते. त्यावेळी प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासह सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पालिकेने नवघर पोलिस ठाण्याला दिल्यानंतर ढवण यांनी आपले उपोषण काही तासांतच मागे घेतले.
प्रभाग ३ अंतर्गत असलेल्या आरएनपी पार्क येथील पालिकेच्या भूखंडाचा वापर होत नसल्याने तेथे गर्दुल्यांचा वावर वाढला होता. त्यातच तेथे उघड्यावर शौच केले जात असल्याने आसपासच्या रहिवाशांना त्याचा त्रास होत होता. हा त्रास कमी करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका नीलम ढवण यांनी तेथे नगरसेवक निधीतून खुली व्यायामशाळा व लहान मुलांसाठी खेळणी बसविण्याचा प्रस्ताव पालिकेकडे दिला. तो मंजुर केल्यानंतर पालिकेने त्या भूखंडावर कुंपण भिंत बांधण्यास सूरुवात केली. त्याला विरोध करीत प्रभाग २ मधील भाजपा नगरसेवक तथा प्रभाग समिती ३ चे सभापती मदन सिंह यांनी त्या जागेचा एक भाग आपल्या प्रभागात येत असल्यासह ती जागा तेथील रहिवाशांची पायवाट असल्याचा कांगावा करीत पालिकेने बांधलेली भिंत पाडली. त्यावेळी त्यांनी त्याच जागेतून प्रस्तावित उत्तर भारतीय भवनाकडे रस्ता जात असल्याचा दावाही केला. त्या जागेत खुली व्यायामशाळा सुरू करुन खेळणी बसविल्यास गर्दुल्यांचा वावर वाढणार असल्याचा जावईशोध त्यांनी लावला. सिंह यांनी केलेल्या प्रतापात पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ढवण यांनी लावून धरली. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रशासन कारवाई करण्यास प्रशासनाने टाळाटाळ सुरु केली. याखेरीज नगरसेवक व प्रभाग निधीतून अनेक विकासकामे ढवण यांनी प्रस्तावित केली असता प्रशासनाने त्याला मंजुरी दिली. परंतु, सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली प्रशासनाने ती रद्द केल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात ढवण यांनी सोमवारी आयुक्त दालनाबाहेर आमरण उपोषण सुरु केले. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना तेथे उपोषण करण्यास मनाई करुन मुख्यालयाबाहेर करण्याची सूचना केली. ती झुगारुन ढवण यांनी तेथेच उपोषण सूरु केले. अतिरीक्त आयुक्त सुनिल लहाने यांनी त्यांना चर्चेसाठी पाचारण केले असता त्यांनी त्याला नकार दिला. अखेर शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्ष नेता राजू भोईर, उपजिल्हाध्यक्ष शंकर विरकर, गटनेता हरिश्चंद्र आमगावकर आदींनी प्रशासनासोबत चर्चा करुन सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा रेटा प्रशासनाकडे लावून धरला. अखेर प्रशासनाने तसे पत्र नवघर पोलिसांना दिल्याचे दाखवुन उर्वरीत मागण्या देखील मान्य केल्याचे स्पष्ट केले. ते पत्र ढवण यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहिर केले.