मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मंगळवारच्या महासभेत पालिका अधिकारी व कर्मचारी यांना २२ हजार ४५० रुपये इतके दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . परंतु कोरोना काळात काम करून देखील गेल्यावर्षी इतकेच अनुदान दिल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या सेवेतील कायम स्वरूपी १४२८ अधिकारी - कर्मचारी यांना दिवाळी निमित्त २२ हजार ४५० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु गेल्या वर्षी देखील इतकीच दिवाळी अनुदान रक्कम मिळाली असल्याने यंदा कोरोना काळातील केलेले काम आदींचा विचार करता काही प्रमाणात तरी दिवाळी अनुदान वाढवून मिळेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती.
महासभेत मात्र गेल्या वर्षी इतकेच अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या शिवाय अस्थायी संगणक चालकांना १७ हजार ३०० रूपये ; बालवाडी शिक्षिका (ठोक मानधनावरील कर्मचारी) यांना ९ हजार ८८७ रूपये ; वैद्यकीय आरोग्य विभागातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना १४ हजार २५२ रुपये ; सर्वशिक्षा अभियान अंतर्गत काळजीवाहक कर्मचाऱ्यांना ६ हजार १७९ रूपये ; सेवानिवृत्त लेखापरिक्षण अधिकाऱ्यांना २२ हजार ४५० रूपये, वैद्यकीय विभागातील क्षयरोग कर्मचाऱ्यांना १४ हजार २०० रूपये, प्राथमिक शाळेतील शिक्षकांना १९ हजार ७०० रूपये आणि सर्वशिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी तथा शालेय पोषण आहार अंतर्गत कर्मचारी यांना १७ हजार ३०० रूपये इतके दिवाळी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अनुदानापोटी पालिकेकडून ३ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे . कोरोनाच्या संसर्ग काळात कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले आहे . त्यांना कोरोना सेवेचा कोणताच भत्ता सुद्धा दिला गेला नाही आहे . तसे असताना दिवाळी अनुदान यंदा वाढवून देणे अपेक्षित असताना गेल्या वर्षी प्रमाणेच अनुदान दिल्याने कर्मचारी नाराज असल्याचे कामगार सेनेचे सल्लागार गोविंद परब , पदाधिकारी धनेश पाटील , श्याम म्हाप्रळकर आदींनी म्हटले आहे . पालिका प्रशासनास या बाबत निवेदन देणार असल्याचे परब म्हणाले.