मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना घरीच उपचारासाठी ठेऊन त्यांना आवश्यक औषध आदींचे किट मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अशा रुग्णांच्या प्रकृतीचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी कॉल सेंटरदेखील सुरू केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे.
कोरोना झालेल्या ज्या रुग्णांना घरी ठेवण्यात आले आहे, अशा रुग्णांच्या दैंनदिन आरोग्य स्थितीची विचारपूस करणे तसेच त्यांना आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय मदत वेळेवर देण्यासाठी मनपातर्फे कोविड केअर कॉल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याबाबत ऑर्नेट हेल्थ केयर प्रा. लि. या संस्थेमार्फत कोविड केअर कॉल सेंटर चालविण्यात येणार असून संस्थेमार्फत महापालिकेच्या स्थायी सभागृहात प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
या वेळी शासनाच्या घरीच अलगीकरणच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ज्या कोविड रुग्णांना घरी ठेवण्यात येते, अशा प्रत्येक रुग्णाच्या घरी उपचाराकरिता आवश्यक असलेला औषधांचा संच पालिका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त डॉ. राठोड आदींच्या हस्ते देण्यात आला.
वरील औषधे आदी साहित्य किटच्यास्वरुपात मनपा नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरीच अलगीकरणात ठेवलेल्या प्रत्येक रुग्णास देण्यात येणार आहे. जेणेकरून रुग्णास अलगीकरण काळात दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही.
या संस्थेमार्फत महापालिकेच्या कोविड कॉल सेंटरच्या माध्यमातून घरी ठेवण्यात आलेल्या कोविड रुग्णांना दररोज एक वेळ व कोविड होऊन गेलेल्या रुग्णांना आठवड्यातून एक वेळ थेट संपर्क करण्यात येणार आहे.
अशा रुग्णांना जर वैद्यकीय मदत हवी असेल तर महानगरपालिका मुख्यालयात स्थापन करण्यात आलेल्या “वॉररुम”मधील डॉक्टरांकडून ही मदत तत्काळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक रुग्णांस मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशनही या सुविधेमार्फत करण्यात येणार आहे.