मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांनी परिवहन सेवेचा ठेकेदार भागीरथी एमबीएमटीला ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली असताना आता पालिकेनेच पुन्हा बससेवा ठेकेदाराच्या हवाली केली आहे. पालिकेने स्वतः बससेवा चालवण्याच्या भूमिकेपासून घूमजाव करत ठेकेदाराच्या पदरात लाखो रुपयांची रक्कम टाकली. आयुक्त-ठेकेदाराच्या बैठकीस उपमहापौर, सभागृह नेता आणि नगरसेवक उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
परिवहन सेवा मे. भागीरथी एमबीएमटीला दिली असून पालिकेने ठेकेदारास मोफत बस, अत्याधुनिक डेपो आदी दिले आहे. त्या उपर पालिका ठेकेदारास प्रतिकिमी मागे २६ रुपये अदा करत आहे. कोरोना संक्रमण काळात कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी, परराज्यातील नागरिकांना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी बस सेवा चालवली जात होती. परंतु ठेकेदाराने पुरवणी करार करून विविध कारणांचे अतिरिक्त पैसे मागितले.
तर कर्मचाऱ्यांनी पगार मिळावा म्हणून ठेकेदार-पालिकेकडे मागणी चालवली. भाजपाप्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने अचानक संप केल्याने पालिका व आपत्कालीन सेवेतील कर्मचारी यांचे हाल झाले. त्यावेळीसुद्धा ठेकेदारांसह संपकऱ्यांवर कारवाईची मागणी झाली, पण प्रशासननाने अजून कारवाई केली नाही.
पालिकेने सतत सांगितल्यानंतर अखेर १४ ऑगस्टपासून ठेकेदाराने केवळ उत्तन - चौकसाठी ५ बस सुरू केल्या. ठेकेदारासह भाजपाचे नेते, नगरसेवक यांनी आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी अवास्तव पैसे देण्यास नकार दिल्याने भाजपाप्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने मंगळवार ८ सप्टेंबरपासून उत्तन-चौकची बस सेवा बंद पाडली. तेव्हापासून या मार्गावर बस नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रिक्षाचालक मनाला वाट्टेल तसे भाडे घेत आहेत. शहरातील अन्य भागातील नागरिकांचेसुद्धा बसअभावी हाल सुरू आहेत.
ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे बससेवा ठप्प होऊन नागरिकांचे हात होत असल्याने ठेका रद्द करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक व गीता जैनसह भाजपाचे नगरसेवक एड. रवी व्यास आदींनी केली. पालिका प्रशासनाने देखील ठेका रद्द करून पालिका स्वतःच बस चालवेल असे जाहीर केले. कर्मचाऱ्यांनी पालिकेने बस चालवल्यास सहकार्य करण्याचे जाहीर केले. आयुक्तांनी ठेका रद्द करण्याबाबत ठेकेदारास २१ रोजी नोटीस बजावली आणि २३ रोजी बैठकीस उपस्थित राहण्यास कळवले. विशेष म्हणजे २३ रोजीच्या आयुक्तांकडील बैठकीत ठेकेदार मनोहर सकपाळसह उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेता प्रशांत दळवी, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटीलसुद्धा हजर होते.
सदर बैठकीत चर्चा होऊन ठेकेदाराच्या मागणीप्रमाणे पुरवणी करार करण्याचे ठरवण्यात आले. ठेकेदारास पालिका कराराप्रमाणे २६ रुपये प्रतिकिमी देईलच, याशिवाय ५० टक्के प्रवासी कमी घ्यायचे म्हणून ठेकेदारास नुकसानभरपाई पालिका देणार आहे. परिवहन समितीने ठराव केल्यानुसार इतर रकमा दिल्या जाणार आहे. २३ मार्च ते ३१ मेपर्यंत बस सेवेसाठी अतिरिक्त २७ रु. प्रति किमी तर १ जून ते १० ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांची देय रक्कम देखील पालिका देणार आहे.
इतकेच काय तर एप्रिल ते सप्टेंबर या काळातील आरटीओ कर आणि विमासुद्धा पालिका अदा करणार आहे, असे ठेकेदाराच्या पत्रावरून समोर आले आहे. त्यातच प्रशासन आणि ठेकेदाराची बैठक असताना सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांची हजेरी पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील म्हणाले की, बैठकीला आम्ही उपस्थित होतो आणि या प्रकरणात तोडगा निघून ठेकेदारासोबत पुरवणी करार होताच, तो बससेवा सुरू करेल, असा निर्णय झाला आहे.
वसई विरार महापालिकेने याच ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची धमक दाखवली असताना मीरा भाईंदर मध्ये मात्र महापालिका प्रशासनाने सत्ताधारी भाजपाच्या दबाव खाली नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदारालाच कायम ठेवत पालिकेची लूटमार करण्यास मोकळे रान करून दिल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राजू भोईर यांनी केला आहे . प्रशासकीय बैठकीला ठेकेदारा सोबत भाजपाचे उपमहापौर , सभागृह नेता , नगरसेवक यातून ठेक्यात ह्यांचे हितसंबंध आहेत हेच स्पष्ट होते असे भोईर म्हणाले .