लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावरील जिओआय रँक २०२३ मध्ये राज्यात मीरा भाईंदर महापालिकेचा दुसरा क्रमांक चे मानांकन मिळाले आहे .
केंद्र सरकारने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ साला पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत संशयित क्षयरुग्ण शोधणे, नवीन क्षयरुग्ण निदान करणे व त्यांना उपचारावर आणणे हे काम राज्यातील जिल्हा क्षयरोग अधिकारी व शहर क्षयरोग अधिकारी यांच्या मार्फत राबविले जाते.
यासाठी केंद्रशासन स्तरावर मुख्य ९ निर्देशांकांचे गुणांकन करुन राज्याचे रँकिंग काढले जाते. त्याच धर्तीवर जिल्हा / शहर क्षयरोग केंद्र यांचे रँकिंग तयार केले जाते. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधित निक्क्षय प्रणाली आधारीत अहवालांचे परीक्षण केले असता केंद्रशासनाच्या मुख्य ९ निर्देशांकांमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने उत्तम काम केलेले निदर्शनास आले आहे . त्याआधारे राज्याचा जिओआय रँक २०२३ तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने द्वितीय क्रमांक पटकविलेला आहे.
आयुक्त संजय काटकर यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने, क्षयरोग अधिकारी डॉ. बालनाथ चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कार्यक्षेत्रात क्षयरोग निर्मूलन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. मीरा भाईंदर शहर क्षयरोग मुक्त
करण्यासाठी विविध प्रकारची उपचार पद्धती, शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करणेकामी महानगरपालिकेचे मोलाचे योगदान आहे. क्षयरोग मुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांचे योगदान देखील महत्त्वाचे राहणार आहे असे पालिके कडून सांगण्यात आले .
क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करून घेणे, आपल्या परिसरातील क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीची माहिती आरोग्य केंद्रात देण्याचे आवाहन आयुक्त संजय काटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.