मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या राई येथील शिवनेरी नगरमध्ये सरकारी जागा बळकावून कांदळवन, सीआरझेडमध्ये सुट्टीच्या दिवसात नव्यानं झालेल्या ८ बांधकामांवर पालिका आयुक्तांच्या आदेशानं सोमवारी कारवाई करण्यात आली.शिवनेरी नगर हे सरकारी जागेत बेकायदा जागा बळकावून वसवण्यात आले आहे. कांदळवनाची तोड करुन सीआरझेडमध्ये सर्रास भराव करुन बांधकामे केली गेली आहेत. स्थानिक नगरसेवकांचा या बांधकामांना वरदहस्त असून पालिका प्रशासनदेखील कारवाई करण्याऐवजी येथे सर्व सुविधा पुरवत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत.शुक्रवार ते रविवार असे सुट्टीचे तीन दिवस साधून शिवनेरी नगर मधील गल्ली क्र. १६ व १९ मध्ये बेकायदा खोल्यांची कामे करण्यात आली. या प्रकरणी आयुक्तांच्या आदेशानंतर प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी व त्यांच्या पथकानं आज सोमवारी पोलीस बंदोबस्तात ८ खोल्या तोडल्या. नगरसेवक नयना म्हात्रे, जयेश भोईर यांनी मात्र आम्ही सतत तक्रारी करुनदेखील बांधकामांवर तसेच बांधकामे करणाऱ्यांवर ठोस कायदेशीर कारवाई होत नाही, अशी तक्रार केली. कांदळवनांची तोड करुन बेकायदा बांधकामं करणाऱ्या माफियांविरोधातील कारवाईबद्दल महसूल विभागाचीही टोलवाटोलवी सुरू आहे.
सीआरझेड क्षेत्रातील अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 5:10 PM