मीरारोड - महापालिकेचे बोधचिन्ह असलेले बेकायदा भलामोठा बॅनर खुद्द महापौर व आमदारांनीच लावल्याने टीकेची झोड उठल्यानंतर बॅनर काढण्यात आला. पण बॅनर लावता यावा म्हणून पालिका पदाधिकारी आणि गटनेत्यांची तातडीची बैठक महापौरांनी बोलावून त्यात दर्शनी भागात एक बॅनर लावण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौरांनी तर येणाऱ्या महासभेतसुध्दा हा विषय घेतला आहे. त्यामुळे बॅनरबाजीच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांनीच घुमजाव करत स्वत:चा बॅनर लावण्यासाठी आटापिटा चालवल्याचे स्पष्ट झाले आहे.
५ सप्टेंबर रोजीच्या महासभेत आयुक्त बालाजी खतगावकर यांनी बॅनर बद्दल दिलेल्या प्रस्तावावर सत्ताधारी भाजपासह शिवसेना, काँग्रेसने १ ऑक्टोबरपासून बॅनरला परवानगी दिली जणारा नाही असा ठराव केला. १ ऑक्टोबर रोजी महापौर डिंपल मेहता , आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त खतगावकर यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी पालिका कर्मचाऱ्यांसोबत अनेक बॅनर व लोखंडी फलक काढले. पण त्यानंतर सुध्दा शहरात बॅनर असल्याचे आढळून आले. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सतत उल्लंघन करुन बेकायदा बॅनरबाजीला जबाबदार असणाऱ्या आयुक्तांसह संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी आदींवर कारवाईच्या तक्रारी सातत्याने पालिकेसह शासना कडे करण्यात आल्या. पण पालिकेने नेहमी प्रमाणेच बॅनरबाजांवर गुन्हे दाखल केले नाहीत.
त्यातच भाजपा व इस्ट वेस्ट फाऊंडेशनने पहिल्यांदाच भार्इंदरच्या कस्तुरी गार्डनमध्ये लोटस नावाने दांडिया - गरबाचे आयोजन केले आहे. त्यासाठी भाजपा आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता यांचा भलामोठा बॅनर लावण्यात आला . त्यावर पालिकेचे बोधचिन्हसुध्दा टाकले होते. स्वत:च बॅनरबंदी केल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्वत:च बेकायदा बॅनर लावायचे त्यावरुन सोशल मीडियासह विविध स्तरावर टीकेची झोड उठून तक्रारी केल्या गेल्या. आमदार, महापौर व आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली. त्यामुळे तो वादग्रस्त बॅनर काढण्यात आला. परंतु पुन्हा बॅनर लावता यावा म्हणून महापौरांनी चक्क पालिका पदाधिकारी, गटनेते, आयुक्त, अधिकारी आदींची तातडीची बैठक बोलावली. त्यात काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार, शिवसेनेचे राजु भोईर, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी बॅनर बंदीची भुमिका लावून धरली.
इनामदार यांनी तर न्यायालयाचे आदेश व त्याचा उहापोह करत प्रशासनासह सत्ताधारयांची अडचण वाढवली. अखेर मंडपाच्या दर्शनी भागात एकच बॅनर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्त खतगावकर यांनीदेखील मंडपाच्या दर्शनी भागात एकच बॅनर लावण्या बद्दल आग्रह धरला होता. नवरात्र मंडळ आदिंना मंडपाच्या दर्शानी भागात एक बॅनर लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु पालिकेचे बोधचिन्ह वापरुन लावलेल्या बेकायदा बॅनर व बांबुच्या फ्रेम प्रकरणी कारवाई मात्र पालिकेने गुंडाळल्यात जमा आहे.