मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात ५७ इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून सदर बसची चाचणी पुणे येथे महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांनी केली . लवकरच २५ बस ह्या प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
परिवहन सेवेमार्फत ७४ पैकी ७० बस नागरिकांच्या सेवेत आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासना कडून मिळालेल्या निधीतून मीरा भाईंदर महापालिकेने पर्यावरणपूरक असलेल्या ह्या ५७ इलेक्ट्रिक बस खरेदीचे कंत्राट पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन कंपनीला दिले आहे.
यामध्ये ९ मीटर लांबीच्या ३२ तर १२ मीटर लांबीच्या २५ बस आहेत . यातील २५ बस ह्या लवकरच पालिकेला मिळणार आहेत. त्या मध्ये १० बस ह्या वातानुकूलित तर १५ बस ह्या साध्या असणार आहेत . नवीन बस आल्या नंतर प्रवाश्याना आणखी सेवा मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.
तयार ई बस ची पाहणी व चाचणी मंगळवारी आयुक्त ढोले, अतिरिक्त आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक अनिकेत मानोरकर, परिवहन उप-व्यवस्थापक योगेश गुणीजन, प्रशासकीय अधिकारी दिनेश कानगुडे सह बस उत्पादककंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बस पाहणी दरम्यान आयुक्त यांनी उत्पादकांना आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी बस ची एकूणच मॅकेनिकल तसेच बांधणी व त्यातील सुविधांची माहिति कंपनी तर्फे देण्यात आली . पालिकेने ९० हजारांचा टप्पा पार केला असून नवीन बस आल्या नंतर सव्वा लाख प्रवाश्यांचा टप्पा पालिका ओलांडेल असा मानस परिवहन व्यवस्थापनाचा आहे.