भार्इंदर : स्वच्छता सर्वेक्षणाच्या वेळी शहर चकाचक ठेवण्याचा महापालिकेचा दिखावा काही नवीन नाही. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पूर्व येथील प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मात्र, कच-याचे ढीग साचून त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता सर्वेक्षणावेळी पालिका भिंतीवर रंगवलेल्या ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ या बोधवाक्यावरच लोक कचरा टाकताना दिसत आहेत. भर रस्त्यातील या कचºयामुळे पादचाऱ्यांसह मुले आणि स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आले आहेत.पूर्वेच्या तलाव मार्गावर पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आहे. त्याच इमारतीत पालिकेची शाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील चालवली जाते. शहर स्वच्छतेचे उपदेश लोकांना देणाºया पालिकेच्या या प्रभाग कार्यालयाबाहेरील रस्त्याला मात्र उकिरड्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावर मोठ्या संख्येने बसणारे फेरीवाले आपला कचरा येथे तसाच टाकून जातात. तर परिसरातील काही लोक दिवसरात्र आपला कचरा आणून टाकत असतात.भररस्त्यात तेही पालिका शाळा - कार्यालयाबाहेर झालेल्या कचराकुंडीमुळे नेहमीच रस्त्यावर कचरा पसरतो. दुर्गंधीमुळे पादचारी तसेच रहिवासी त्रस्त आहेत. शाळा सध्या बंद असल्या तरी शाळेच्या वेळेत तर मुलांना नाक दाबून वाट काढावी लागते. शहर कचराकुंडीमुक्त झाल्याचे पालिका सांगते. स्वच्छता सर्वेक्षणात पुरस्कार मिळवल्याचा टेंभा पालिका मिरवते. पण रोज उघड्या डोळ्यांना दिसणारी बेकायदा कचराकुंडी आणि दुर्गंधाचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.परिसरातील तरुण कार्यकर्ता सुनील कदम यांनी डिसेंबरपासून ‘आपलं सरकार’ पोर्टलवर आतापर्यंत तब्बल सहा वेळा तक्रार केली आहे. यातील केवळ तीन तक्रारींचे उत्तर पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार कांबळे यांनी कदम यांना दिले आहे. वास्तविक दुपारच्या वेळी कचºयाची गाडी कचरा घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले; परंतु कचरा टाकणे थांबले नसताना पालिका मात्र खोटे उत्तर देऊन हात झटकते आहे.स्वच्छतेच्या नावाखाली गैरप्रकार चालत असून ‘आपलं सरकार’ पोर्टलवर तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही. कचरा टाकण्यास कायमचे बंद करण्याऐवजी पालिका केवळ दिशाभूल करत खोटी उत्तरे देत आहे. या प्रकरणी कचरा टाकणारे तसेच जबाबदारी असणाºया अधिकाºयांवर कारवाई केली पाहिजे. शहराची कचरपट्टी केली जात आहे.- सुनील कदम ( स्थानिक रहिवासी )आपलं शहर कचराकुंडीमुक्त शहर असून सदर ठिकाणी कचरा टाकणाºयांविरोधात कारवाई केली जाईल. रोज गोळा टाकला जाणारा कचरा बंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू. स्वच्छता निरीक्षकास कारवाईचे निर्देश दिले आहेत.- डॉ. संभाजी पानपट्टे ( उपायुक्त, मुख्यालय )
मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग कार्यालयाबाहेरच कचऱ्याचे ढीग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:55 AM