मीरारोड - महापालिका शाळांचा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने सामाजिक संस्थांना सोबत घेऊन सेंटर ऑफ एक्सलेन्स-एज्युकेशन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे .
मीरा भाईंदर महापालिकेच्या शहरात ३६ शाळा आहेत . सदर शाळांच्या शिक्षकांच्या पगार पासून शाळेच्या व्यवस्थापन , शैक्षणिक साहित्य , शाळांची देखभाल - दुरुस्ती आदींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी करून देखील शाळा आणि शिक्षणाचा दर्जा मात्र उंचावण्या कडे तत्कालीन नगरसेवकां पासून राजकारणी यांनी दुर्लक्षच केले आहे .
मागील आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिका शाळा आणि शिक्षकांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करत विविध उपक्रम राबवले . ढोले हे नियमितपणे शाळांच्या बद्दल बैठका घेऊन आढावा घेत होते . ढोले यांच्या बदली नंतर आलेले आयुक्त संजय काटकर यांनी देखील पालिका शाळांचा दर्जा उंचावण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे . आयुक्त काटकर, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांच्या उपस्थितीत सेंटर ऑफ एक्सलेन्स - एज्युकेशन या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत महापालिका शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व सामाजिक संस्था
यांच्याशी चर्चास्पर संवाद साधण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपक्रमातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता, भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी सात सामाजिक संस्था सेंटर ऑफ एक्सलेन्स - एज्युकेशन या उपक्रमात सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविणे, शारीरिक विकास यासाठी सामाजिक संस्था महत्त्वाचा दुवा म्हणून सक्रिय राहणार आहेत जेणेकरून महापालिका शाळेतील शिक्षकांना त्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल.
यामध्ये सुपर टी २० साठी महापालिकेच्या २० शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या ३ महिन्यात एका शाळेची निवड करून सेंटर ऑफ एक्सलेन्स - एज्युकेशन उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. भविष्यात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी व सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी सांगितले .