लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड - मीरा-भाईंदर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणासाठी कनिष्ठ अभियंता, बिट निरीक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित केली असून गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
उपायुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागांतील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत उपायुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, गॅरेज, पदपथावरील व्यावसायिक, अनधिकृत होर्डिंग्ज यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.
गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम यांनी दोन मजल्यांचे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केले. प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी एका जीन्स फॅक्टरी व शूटर स्नूकरचे अवैध शेड तोडले. प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांनी काशिमीरा जकातनाका, डायमंड टॉवर इमारतीलगत मोकळ्या जागेत असलेल्या बांबू, ताडपत्री व लोखंडी अँगल व पत्र्याच्या साहाय्याने केलेल्या ३ अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम तोडले. डाचकुलपाडा येथे असलेले २ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. काशिमीरा पुलाखाली असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत फेरीवाल्यांवर तर प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले यांच्या पथकाने अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्त मुठे यांनी दिले आहेत.