मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या आधी झालेल्या सिमेंट रस्त्यात घोटाळे झाल्याच्या तक्रारी असतानाच आता पालिकेने नव्याने सिमेंट रस्त्यांची काढलेली कामे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत . कमी दराच्या निविदा बाजूला सारून मर्जीतील ठेकेदारांना चढ्या दराने कंत्राटे देण्याचा घाट पालिकेने घातला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेने या आधी मोठा गाजावाजा करत करोडो रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे केली . ८ सिमेंट रस्त्यांची कामे देखील तब्बल ३० टक्क्यां पर्यंत जास्त दराने देऊन ८० कोटी खर्च केले होते . त्या कामात घोटाळा झाल्याच्या तक्रारी झाल्या आणि शासनाने चौकशी पण लावली . परंतु आयआयटी वर संशय असताना त्यांच्या कडूनच अहवाल घेतले जात आहेत .
८० कोटी खर्चून बनवलेले सिमेंट रस्त्यांना तडे गेले , वरचे सिमेंट उडाले काही ठिकाणी खड्डे पडले. साहित्य आणि कामाच्या तांत्रिक दर्जात तसेच अवास्तव अंदाजपत्रक बनवण्यात आल्याचे गंभीर असताना देखील सारवा सारव करण्या कडे पालिका , नगरसेवक आणि राजकारणी यांचा कल असल्याचा आरोप होत आला आहे . आमदार प्रताप सरनाईक यांनी सिमेंट रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केल्यावर कोकण आयुक्तांना या प्रकरणी चौकशीचे आदेश शासनाने दिले होते . परंतु त्या चौकशीचे काय झाले ? आणि त्यावर आ. सरनाईक सुद्धा काही बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २७ जुलै ते १९ ऑगस्ट दरम्यान २० कामांसाठी निविदा काढलेल्या निविदां मध्ये ९ सिमेंट रस्त्याच्या कामाच्या निविदा मागवून ठेकेदारांना तब्बल २२ टक्के पर्यंत जास्त दराने निविदा देण्याचा घाट घातला आहे . धक्कादायक बाब म्हणजे निविदा सूचना क्रमांक ४२ व ४३ मधील सिमेंट रस्त्यांची कामे वगळता बाकी सर्व कामे हि अंदाजपत्रका पेक्षा तब्बल २० ते २५ टक्के कमी दराच्या असून त्या पालिकेने स्थायी समितीकडे मंजुरी साठी सादर केल्या आहेत.
वास्तविक ९ सिमेंट रस्ते बनविण्याच्या कामाच्या निविदां साठी पालिकेने तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली . मर्जीतील ठराविक कंत्राटदारां शिवाय अन्य कंत्राटदार निविदेत बसू नये या साठी ठराविक अटी टाकण्याची खास काळजी घेतली गेली . त्या मर्जीतील ठेकेदारांसाठी अचानक अटी पुढे केल्या जातात . एका निविदेत तीन वेळा शुद्धीपत्रक देऊन मुदतवाढ दिली गेली . यातूनच १९ ते २२ टक्के जास्त दरांच्या निविदा स्वीकारून आता त्या मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर केल्या गेल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले .