भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने एका बाजुला प्रभावी रुग्ण सेवा देण्याला चाट लावली असतानाच दुसय््राा बाजुला गरीब रुग्णांच्याच खिशाला कात्री लावत रुग्ण व शववाहिकांच्या दरात तिपटीहुन वाढ केली आहे. पालिकेच्या या भरमसाठी दरवाढीमुळे सामान्य रुग्णांत तीव्र नाराजी पसरली आहे.पालिकेने शहरातील रुग्णांना माफक दरात रुग्णसेवा पुरविण्यासाठी सुरु केलेल्या रुग्णालयांसह माफक दरात रुग्ण व शववाहिकांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सुरुवातीला खाजगी रुग्णवाहिकेच्या ११ ते १२ रुपये प्रती किलोमीटर दरापेक्षा प्रती किलोमीटर ४ रुपये या अत्यंत कमी दर लागु केल्याने सामान्य व गरीब रुग्णांना रुग्णवाहिकांचा आधार मिळत होता. परंतु, शहरातील गरीब रुग्णांच्या मृत्युपश्चात त्याचे शव शहरांतर्गत वाहुन नेण्यासाठी पालिकेने २ वर्षांपुर्वी शववाहिनी मोफत उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केल्याने त्याचाही शहरातील नागरीकांना लाभ मिळू लागला. शहराबाहेर जाण्यासाठी मात्र ४ रुपये प्रती किलोमीटरप्रमाणेच दर वसुल करण्यात येत असे. यातुन रुग्णवाहिकांना वगळुन त्यांच्या वापरासाठी ४ रुपये प्रती किलोमीटर दर मात्र कायम ठेवण्यात आला. खाजगी रुग्ण शववाहिकेच्या तुलनेत पालिकेच्या रुग्णवाहिकेचा दर ७ ते ८ रुपये कमी असल्याने त्याचा लाभ अधिकाधिक रुग्णांकडुन घेतला जाऊ लागला. परंतु, वाढती महागाई व इंधनाचे दर वाढल्याने पालिकेने रुग्णवाहिकेच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव १९ जूनच्या महासभेत सादर केला. त्यात प्रती किलो मीटरचा दर ४ रुपयांवरुन थेट १५ रुपये करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्याला महासभेने मान्यता दिल्याने हा दर अलिकडेच लागु करण्यात आल्याने सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांत तीव्र नाराजी पसरली आहे. पालिकेकडे सध्या एकुण ३ शववाहिका, ६ रुग्णवाहिका व आ. प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतुन १ अद्यावत कार्डियो रुग्णवाहिका आहे. पालिकेने लागु केलेला दर खाजगी रुग्ण व शव वाहिकांच्या तुलनेत ४ ते ५ रुपये अधिक असल्याने सामान्य रुग्णांना तो आवाक्याबाहेर ठरु लागला आहे. त्यातच पालिकेच्या रुग्ण व शववाहिकांना जिल्ह्यातच ये-जा करण्यास परवानगी असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्यास मात्र खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे पालिकेच्या रुग्णवाहिकांचा वापर कमी होऊन खाजगी रुग्णवाहिकांचा वापर वाढण्याची भिती अधिकाय््राांकडुन व्यक्त होऊ लागली आहे. शववाहिका शहरांतर्गत मोफत असल्या तरी शहराबाहेर जाण्यास निश्चित दर मृताच्या नातेवाईकांना मोजावा लागतो. पालिका रुग्णवाहिकांच्या तुलनेत खाजगी रुग्ण व शव वाहिकांचे राज्यातील दर प्रती किलोमीटरसाठी ११ ते १२ रुपये व परराज्यात जाण्यासाठी १६ ते १८ रुपये आकारले जात असल्याने राज्यांतर्गत खाजगी रुग्ण व शववाहिकांचे दर परडवणारे ठरण्याचे स्पष्ट झाले आहे.याबाबत उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले कि, इंधनाचे दर वाढल्यामुळे रुग्ण व शववाहिकांचा दर सभागृहाच्या मान्यतेनेच वाढविण्यात आला आहे. खाजगी रुग्णवाहिकांच्या तुलनेत पालिका वाहिकांचे दर कमी करण्यासाठी देखील सभागृहाची परवानगी आवश्यक ठरणार आहे. तसेच समाजसेवक प्रकाश नागणे यांनी, पालिकेची रुग्णसेवा समाधानकारक नसतानाही रुग्ण व शववाहिकांचे दर खाजगीपेक्षा अधिक वाढविण्यात आले आहेत. ते गरीब रुग्णांसाठी अन्यायकारक असुन ते त्वरीत कमी करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
मीरा-भाईंदर पालिकेच्या रुग्ण व शववाहिनीचे दर तिपटीहून अधिक वाढले - राजू काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 6:53 PM