मीरारोड - शहर स्वच्छतेच्या पुरस्काराचा तोरा मिरवणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेचा अस्वच्छतेचा बुरखा खुद्द महापालिका आयुक्तांच्या पाहणीतच उघड झाला आहे. भाईंदर पूर्वेच्या भाजीमार्केट गल्ली व औद्योगिक वसाहतीतील नेहमीच असलेली गलिच्छ आणि बकाल अवस्था 'वॉक विथ कमिश्नर' उपक्रमा अंतर्गत पाहून आयुक्तांनाच साफसफाईचे आदेश देण्याची पाळी आली.
मीरा भाईंदर महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दर वर्षी स्वच्छतेत इतवा क्रमांक आला, हा पुरस्कार मिळाला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असते. शहर कचराकुंडी मुक्त असल्याचा दावा पालिका करते. परंतु दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याची ढीग व अस्वच्छता असा विरोधाभास पाहायला मिळतो.
इतकेच नव्हे तर शहर हे उघड्यावर शौच मुक्त असल्याचा दावा पालिका करत असली तरी आजही शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचला लोक बसत आहेत. त्यामुळे दरवर्षी पालिकेचा नंबर कसा येतो? व पुरस्कार कसे मिळतात? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात असतो.
शहरातील कचऱ्याचे साम्राज्य व अस्वच्छता याचे विदारक दृश्य भाईंदर पूर्वेच्या औद्योगिक वसाहत व खारीगाव भाजी मार्केट मार्गावर नेहमीच बघायला मिळते. त्याचा प्रत्यय स्वतः आयुक्त दिलीप ढोले यांना त्यांनीच सुरु केलेल्या ' वॉक विथ कमिश्नर ' उपक्रमा अंतर्गत बुधवारी आला. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ व डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त जित मुठे, मारुती गायकवाड व संजय शिंदे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व दिपक खांबीत, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी दामोदर संखे, उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम, स्वच्छता अधिक्षक राजकुमार कांबळे, जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत सह अन्य अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
औद्योगिक परिसरात कारखान्यातील तसेच खारीगाव भाजी मार्केट भागात भाज्या, प्लास्टिक व अन्य कचऱ्याचे ढीगच्या ढीग रस्त्यावर साचलेले होते. गटारे तुंबलेली व अस्वच्छ तर रस्ते सुद्धा चिखलाने भरलेले होते. रस्त्यांवर खड्डे व कचरा - चिखल पसरलेला होता.पदपथ - रस्त्यावर बेकायदा हातगाड्या व फेरीवाल्यांचे तसेच व्यावसायिकांचे अतिक्रमण सुद्धा जागोजागी दिसून आले.
परिसराची ही दुरावस्था पाहून आयुक्तांनी परिसरात स्वच्छता करण्याचे आदेश दिल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा उचलून नेला. परंतु या भागातील ही अस्वच्छता व बकाल अवस्था तर नेहमीचीच पाचवीला पुजलेली आहे. ना पालिका लक्ष देते ना नगरसेवक, राजकारणी लक्ष देतात असा संताप नागरिकांमधून व्यक्त होतो आहे.