मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शुक्रवारी कोरोना लसीकरणाची सराव फेरी राबवली. शहरात पालिकेच्या ३ व खाजगी ६ आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली. स्वतः आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी आढावा घेतला. शहरातील साधरणत: ६२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा लाभ देण्यात येणार आहे . त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या ३ आरोग्य संस्था व ६ खाजगी आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाची सरावफेरी राबविण्यात आली. सकाळी ९ वाजल्यापासून कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीची प्रक्रिया सुरू झाली.
लसीकरणाच्या सरावासाठी ९ संस्थाची निवड करण्यात आली होती. प्रत्येक लसीकरण केंद्रावर २५ लाभार्थी यानुसार लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे . शासन मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक पथकात ५ अधिकारी यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत . पथक निहाय लसीकरणाचे प्रशिक्षण आरोग्य केंद्र व मनपास्तरावर पूर्ण करण्यात आले आहे.
लसीकरण संदर्भात आवश्यक असलेल्या बाबींची पूर्वतयारी करुन प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन ही रंगीत तालीम घेतली गेली. यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान येथील जम्बो फॅसीलीटी मध्ये आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी प्रत्यक्षात लस टोचली गेली नसली तरी लस टोचण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी याची पाहणी आयुक्त यांनी केली.
लस घेणाऱ्या व्यक्तीला नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे लसीकरण केंद्रावर घेऊन जावी लागणार आहेत. या व्यतीरिक्त मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सोशलडिस्टंसींग पालन करणे इ. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक राहील असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.