मीरा भाईंदर राष्ट्रवादीचे ३ जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात; शरद पवार गटाला धक्का 

By धीरज परब | Published: July 11, 2023 07:40 PM2023-07-11T19:40:30+5:302023-07-11T19:40:51+5:30

मीरा भाईंदर मध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती.

Mira Bhayander NCP's 3 district president Ajit Pawar in the group | मीरा भाईंदर राष्ट्रवादीचे ३ जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात; शरद पवार गटाला धक्का 

मीरा भाईंदर राष्ट्रवादीचे ३ जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात; शरद पवार गटाला धक्का 

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष व युवाचे जिल्हाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सहभागी झाले असून त्यांना त्याच पदांवर नव्याने नेमण्यात आले आहे. शहरात बहुसंख्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे अजित पवार गटासोबत गेल्याने शरद पवार गटाला धक्का मानला जात आहे. 

मीरा भाईंदर मध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. गणेश नाईक व संजीव नाईक हे राष्ट्रवादी सोडून शहरातील त्यांच्या समर्थकांना भाजपात घेऊन गेले. २०१७ सालच्या पालिका निवडणुकी दरम्यान जवळपास सर्वच नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे शहरातले प्रभावी नेतृत्व असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा देखील शिवसेने सोबत गेले. त्यामुळे गेल्या काही वर्षात शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी झाली आहे. शिवाय जे काही पदाधिकारी राष्ट्रवादीत शिल्लक राहिले त्यांची तोंडे देखील आपलसातील मतभेदां मुळे विरुद्ध दिशेला राहिली. 

अजित पवार व समर्थकांनी सत्तेत सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितल्या नंतर शहरातील बहुतांश राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मंगळवारी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी मोहन पाटील , महिला अध्यक्ष पदी अनु पाटील व युवक जिल्हाध्यक्ष पदी जकी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. हे  तिन्ही जिल्हाध्यक्ष पूर्वी सुद्धा त्याच पदावर कार्यरत होते. बंडा नंतर त्यांनी शरद पवार यांच्या गटात न जाता अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. माजी महापौर निर्मला सावळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. 

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते हे अजितदादा यांच्या सोबत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करत पुन्हा महापालिकेत आपला झेंडा फडकवू असे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त झालेल्या मोहन पाटील, अनु पाटील, जकी पटेल यांनी सांगितले आहे. 

तर राष्ट्रवादी काँग्रेस मधून काढून टाकण्यात आलेले माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम हे माजी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर सोबत उपमुख्यमंत्र्यांना भेटून शुभेच्छा देऊन आले होते. कदम यांचा अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होती मात्र स्वतः कदम यांनी त्यात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. 

Web Title: Mira Bhayander NCP's 3 district president Ajit Pawar in the group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.