मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेतील स्थायी आणि मानधनावरील अस्थायी अश्या १८८९ कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वीच सानुग्रह अनुदान गेल्या वर्षा प्रमाणेच देण्याचा निर्णय महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी आयुक्त , पदाधिकारी यांच्या बैठकीत घेतला आहे . महापौरांच्या निर्णया मुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच सानुग्रह मिळणार आहे . पालिका आस्थापने वरील कायम कर्मचाऱ्यांना २२ हजार ४७० तर अन्य अस्थायी कर्मचाऱ्यांना सुद्धा सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे .
कोरोनाच्या संसर्गा मुळे आर्थिक स्थिती बिकट झाली असून पालिकेचे उत्पन्न देखील कमी झाले आहे . त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान किती व कधी मिळणार असा प्रश्न केला जात होता . परंतु महापौर ज्योत्सना हसनाळे यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच सानुग्रह अनुदान देण्याची भूमिका घेत या बाबत गुरुवारी केले होते .
या वेळी त्यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीस आयुक्त डॉ . विजय राठोड सह पदाधिकारी, अधिकारी आदी उपस्थित होते . सदर बैठकीत महापौरांनी कर्मचाऱ्यांना सानुग्रह गेल्यावर्षी प्रमाणे मंजूर केले आहे. त्यात पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते ४ पर्यंत २२ हजार ४७० रुपये तर संगणक चालक व लघुलेखक यांना प्रत्येकी १७ हजार ३०२ रुपये यासह विविध संवर्गातील अस्थायी त्यांच्या वर्गावरीनुसार सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे.
पालिकेत स्थायी आणि अस्थायी कर्मचारी मिळून १८८९ इतकी संख्या असून त्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी ३ कोटी ६२ लाख इतका खर्च होणार आहे . दिवाळी आधीच सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत महापौर व आयुक्तांचे आभार मानले आहेत . सदर खर्चास पुढील महासभेत कार्योत्तर मंजुरी दिली जाणार आहे .